दोघा अट्टल गुन्हेगारांकडून प्राणघातक शस्त्रे जप्त 

दोघा अट्टल गुन्हेगारांकडून प्राणघातक शस्त्रे जप्त 

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याणमधील बाजारपेठ  पोलिसानी दोन अट्टल गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याजवळून ३ रिव्होल्वर, ११ काडतूस, आणि ३ धारधार शस्त्रे जप्त केली आहेत. सुरेश तेवर, प्रवीण लोहरिया असे या आरोपींची नावे असून या  दोघांनी  कल्याणमध्ये मोठा गुन्हा करण्यासाठी ही हत्यारे आणली होती किंवा कसे याबाबत पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती कल्याण परिमंडळचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आज दिली.

यावेळी कल्याण सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र आहिरे उपस्थित होते. एक अट्टल गुन्हेगार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणार असल्याची माहिती कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी बाजार समिती आवार परिसरात सापळा रचला. या दरम्यान सुरेश तेवर या तरुणाला अटक करत त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी कट्टा जप्त केला. सुरेशवर तामिळनाडू आणि मुंबईमध्ये दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सुरेशने दिलेल्या माहितीनुसार त्याचा एक मित्र प्रवीण लोहरीयाला देखील अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे प्रवीणकडूनही पोलिसांनी दोन रिव्होल्वर आणि तीन धारधार शस्त्रे हस्तगत केले आहेत. प्रवीणवर सुद्धा अनेक गुन्हे दाखल असून हे दोघे कल्याणमध्ये मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होते किंवा कसे याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, त्या दोघांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

विनानंबरप्लेट वाहन...

कल्याण-डोंबिवली शहरात अनेक वाहने विनानंबरप्लेट चालविली जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. कल्याण पोलिसांनी अटक केलेला आरोपी सुरेश हाही विनानंबरप्लेट गाडीवर फिरताना सापडून आला. गंभीर बाब म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांकडूनही बऱ्याचदा विनानंबरप्लेटच्या वाहनांचा गुन्हेगारी कारवायांसाठी वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या विनानंबरप्लेट गाड्यांना आळा घालण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे.