टिटवाळा स्थानकातील पादचारी पूल व स्वयंचलित सरकत्या जिन्यांचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण 

टिटवाळा स्थानकातील पादचारी पूल व स्वयंचलित सरकत्या जिन्यांचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण 

टिटवाळा (प्रतिनिधी) : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास आलेल्या टिटवाळा रेल्वे स्थानकातील रेल्वे पादचारी पूल व दोन स्वयंचलित सरकत्या जिन्यांचे लोकार्पण मंगळवारी सायंकाळी संपन्न झाले. 

उदघाटन समयी केंद्रीयमंत्री कपील पाटील यांनी सांगितले की, सन २०१० पासून पादचारी पुल, स्वयंचलित सरकते जिन्यांसाठी माझा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. उपमहापौर उपेक्षा भोईर यांनीही माझ्याकडे रेल्वे कामाबाबत सातत्याने पाठपुरावा करीत होत्या. आज ही दोन कामे पूर्णत्वास आली आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन वाढविणे व रेल्वेगाड्यांचे डबे वाढविण्यासाठीही आपण प्रयत्न करीत आहोत. नियोजित गुरवली रेल्वे स्टेशनच्या बाबतीतही पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टिटवाळा रेल्वे स्थानकात झालेले हे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झालेले असून एका पादचारी उड्डाणपुलासाठी काही खासदारांचा निधी सुपूर्त केला होता. तसेच मांडा पूर्व-पश्चिम यांना जोडणारा उडाणपूलाचे काम सुरू आहे. तेही लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. रेल्वे स्थानकांवरील प्रश्नाबाबत मी दर २ ते ३ महिन्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकां समवेत बैठक आयोजित करून चर्चा करत असतो. याप्रसंगी त्यांनी गुरवली स्टेशन, कसारा, आसनगाव स्थानकांचे प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, १५ डब्यांची लोकल, रेल्वे स्थानकावरीत लिफ्ट, चामटोळी स्थानक हे विषय सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. याबाबत विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांची पत्रे स्वीकारून तवकरच विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसहित सर्व मुख्य रेल्वे अधिकारी यांची बैठक लावून रेल्वेसंदर्भात नवीन भेडसावणाऱ्या समस्या व अपुऱ्या कामांबाबत चर्चा करून समस्या सोडवण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

याप्रसंगी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव परेश गुजरे, शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर, किसान मोर्चा अध्यक्ष जयराम भोईर, मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर, उपाध्यक्ष अमोल केदार, महिला अध्यक्ष मनिषा केळकर, किरण रोठे, विजय आव्हाड, किसन मुंढे, रिक्षा युनियनचे अध्यक्ष बाळा भाईर यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.