कल्याण-डोंबिवलीकरांसमोर विकासाचे ‘दिल्ली मॉडेल’

कल्याण-डोंबिवलीकरांसमोर विकासाचे ‘दिल्ली मॉडेल’

कल्याण (प्रतिनिधी) : आम आदमी पक्ष देशात लोकशाही मानणारी लोककल्याणकारी व्यवस्था आणू इच्छित आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारने लोककल्याणकारी व्यवस्था कशी असावी याचा धडा ‘दिल्ली मॉडेल’च्या रूपाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना घालून दिला आहे. आम आदमी पक्ष कल्याण-डोंबिवलीत ‘दिल्ली मॉडेल’ राबवून कल्याण-डोंबिवलीकरांना लोककल्याणकारी व्यवस्था देईल, अशी हमी आपचे प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे यांनी कल्याण येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपचे प्रदेश पदाधिकारी कल्याण येथे पक्ष बैठकीसाठी आले होते. स्वामी नारायण हॉल येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राचुरे बोलत होते.

यावेळी राचुरे यांच्या समवेत प्रदेश उपाध्यक्ष किशोर मांदियान, प्रदेश सेक्रेटरी धनंजय शिंदे, प्रदेश संघटक विजय कुंभार, प्रदेश सदस्य डॉ. अबू अल्त्माश फैजी, कल्याण डोंबिवलीचे प्रभारी रुबेन मस्करेहान्स, पालघर-ठाणे विभागीय अध्यक्ष विजय पंजाबी, कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड आदी उपस्थित होते.

यावेळी राचूरे पुढे म्हणाले की, आपच्या दिल्ली सरकारने राबविलेल्या असंख्य लोकहिताच्या योजना जनतेच्या कौतुकाच्या व प्रशंसेस पात्र ठरल्या आहेत. सामान्य, गरीब कुटुंबातील मुलांना देखील खाजगी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण, अद्ययावत शाळा, शालेय विद्यार्थ्यांना तरणतलावाचा अनुभव देण्याचा उपक्रम इत्यादी जगभरात चर्चेचा विषय झाले आहेत. घरपोच दाखले व प्रमाणपत्रे, २०० युनिट मोफत वीज, मोफत पाणी अशा केवळ लोकप्रिय ठरणाऱ्या नुसत्या हवेतील घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष गेल्या १० वर्षांपासून अंमलबजावणी केली आहे. आजपर्यंत देशात अशा कोणत्याही योजना राबविण्याची कल्पकता, धडाडी व प्रामाणिकता एकही राजकीय पक्ष दाखवू शकलेला नाही. देशातील सर्वच राजकीय पक्षांचे सामान्य कार्यकर्ते आज चर्चा करताना आपच्या कार्यकर्त्यांकडे ही बाब दिलखुलासपणे मान्य करतात हेच आम आदमी पार्टीचे खरे यश असल्याचेही ते म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीकरांनी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी अशा सर्वच प्रमुख प्रस्थापित पक्षांच्या कारभाराचा अनुभव घेतला आहे. मात्र केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारप्रमाणे एकाही पक्षाला स्वच्छ कारभार करता आलेला नाही, अशी टिका केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील पक्षाच्या कामाचा गुरुवारी आढावा घेण्यात आला. यावेळी कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर येथील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपची कल्याण- डोंबिवलीकरांना हमी...

* मोफत पाणी पुरविणार, 
* महिला व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा पुरविणार, 
* खड्डेमुक्त व सुरक्षित दर्जेदार रस्ते बांधणार, 
* महापालिकेतील टक्केवारीने बरबटलेली भ्रष्टाचारी साखळी मोडीत काढणार, 
* फेरीवाल्यांना दोन वर्षांत फेरीवाला धोरणानुसार टप्प्याटप्प्याने जागा निर्धारित करून देणार, 
* महापालिकेची परिवहन सेवा तोट्यातून फायद्यात चालवून व प्रवाशांना वेळापत्रकानुसार बससेवा पुरविणार.