केडीएमसीच्या कामगारांना २५ हजार सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

केडीएमसीच्या कामगारांना २५ हजार सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

कल्याण (प्रतिनिधी) : यंदाच्या दिवाळी सणानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) सर्व कामगार कर्मचारी यांना २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात यावेत अशी मागणी महानगर सफाई कर्मचारी संघाने महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन केली आहे.

संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारत गायकवाड, अब्बास घडियाली, मधुकर वाल्हेकर यांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत सदरची मागणी केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेतील  १२२ प्रभागात दैनंदिन रस्ते सफाई, गटार सफाई, जंतुनाशक फवारणी व धुरफवारणी प्रभावीपणे कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. तसेच कोरोना बाधीत/संशयीत रूग्ण आढळलेल्या परिसरात व रुग्णांच्या घरात जंतुनाशक फवारणी व धुरफवारणी करण्यात येते. तसेच पाणी पुरवठ्याचे कामगार ऊन, वारा पाऊस याची कोणतीही काळजी न करता नागरीकांची गैरसोय होऊ न देता व्यवस्थितपणे पाणी पुरवठा करतात. अशा वेळी कर्मचाऱ्यास कोरोना विषाणुची बाधा होण्याची शक्यता असते. त्याकरीता कर्मचाऱ्यांना ३०० रूपये भत्ता लागु करण्यात यावा, शासन निर्णय क्र. मभवा-२०१९/प्र.क्र.३०/सेवा-९ दि.७ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासननिर्णयानुसार महागाई भत्ता वाढ दि. १ ऑक्टो. २०२१ पासून रोखीने माहे नोव्हेंबरच्या पेमध्ये देण्यात याव्यात आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यंदा दिवाळीनिमित्त महानगरपालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी तसेच रोजंदारी व ठोकपगारी, परिवहन कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, कंत्राटी कर्मचारी या सर्वांना सानुग्रह अनुदान सन २०२१ करीता रुपये २५०००/- देण्यात यावेत. व दिवाळीपूर्वी दहा दिवस आधी सदरची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात यावी असा महानगर सफाई कर्मचारी संघाचा आग्रह असल्याचे प्रदेश अध्यक्ष गायकवाड यांनी म्हटले आहे.