बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

कल्याण (प्रतिनिधी) : बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्राचे सरचिटणीस ठाणे जिल्ह्याचे प्रभारी शिवाजी गोरे यांनी केली असून संबंधितांवर कारवाई न केल्यास कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गोरे यांनी दिला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडले म्हणून सोमवारी महाराष्ट्रात बंद जाहीर करण्यात आला. या घटनेचा आम्ही निषेध करत असून महाराष्ट्र बंदला आम्ही रिक्षा बंद न ठेवता पाठिंबा दिलेला आहे. परंतु बंदच्या नावाखाली दहशत दादागिरी करून हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब रिक्षाचालकांना मारहाण करण्यात आली. याबाबतचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांमध्ये वायरल झाला असून, रिक्षाचालकांना मारहाण करणार्‍या तथाकथित नेते व कार्यकर्त्यांवर  तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी. अन्यथा रिक्षा चालक मालक यांच्या वतीने ठाणे जिल्हा बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवाजी गोरे यांनी दिला आहे.

रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवल्या ऐवजी रिक्षाचालकांना जबरदस्तीने बंदमध्ये सहभागी करण्यास भाग पाडणे हे बरोबर नसून याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष ठेवून प्रश्न सोडवणे आवश्यक आहे, परंतु त्या प्रश्न सोडवण्याऐवजी रिक्षाचालकांना मारहाण करण्यात येत आहे. या घटनेची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवाजी गोरे यांनी केली आहे.