इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काची मागणी 

इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काची मागणी 

कल्याण (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांनी शुकवारी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात भेट देत महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी सफाई कामगारांच्या समस्यांबाबत ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सारवान यांचे लक्ष वेधले. इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्कासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या.

ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियनचे प्रदेश अध्यक्ष तथा कामगार नेते कोणार्क देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युनियनच्या सफाई कर्मचारी विभागाचे प्रदेश अध्यक्ष भारत लक्ष्मण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अन्य पदाधिकाऱ्यांनी आयोगाचे उपाध्यक्ष सारवान यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबद्दल निवेदन दिले. 

आतापर्यंत फक्त रुकी, मेहतर, वाल्मिकी अनुसूचित जाती याच सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क मिळत आला आहे. यापुढे हा वारसा हक्क ओबीसी, एसटी, एस्सी, व खुला प्रवर्गातील कामगारांनाही मिळावी अशी मागणी विशेष करून करण्यात आली. त्याचप्रमाणे मेडिक्लेम पॉलिसी (वैद्यकीय भरपाई विमा) योजना लागू करण्यात यावी, सफाई कामगारांना ७ वा वेतन ताबडतोब लागू करण्यात यावा व दिवाळी सणाकरिता सानुग्रह अनुदान (बोनस) सफाई कामगारांना मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्या ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियनतर्फे करण्यात आल्या. यावेळी युनिट अध्यक्ष नारायण घेंगट, उपाध्यक्ष  दीपक शैलेंद्र व महिला युनिट अध्यक्ष अश्विनी तांबे हेही उपस्थित होते.