रामदेव बाबावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

रामदेव बाबावर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

ठाणे (प्रतिनिधी) : 
आंबेडकरी विचारधारेच्या अनुयायांना दहशतवादी संबोधणार्‍या रामदेव यादव उर्फ रामदेवबाबा यांच्यावर अ‍ॅट्रसिटी अ‍ॅक्ट अन्वये कारवाई करावी, अशी मागणी करणारी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे ठाणे अध्यक्ष कैलास हावळे, नगरसेविका आरती गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

रिपब्लीक टीव्हीवर रामदेव बाबा यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रामास्वामी पेरीयार यांना वैचारीक दहशतवादाचे जनक असल्याचे म्हटले असून ही विचारधारा मानणारे लोकही दहशतवादी असल्याचे म्हटले होते. या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध होत असतानाच बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास हावळे, आरती गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले  यांची भेट घेतली.

यावेळी शिष्टमंडळाने त्यांना लेखी स्वरुपात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, रामदेव बाबाने ठराविक जातप्रवर्गाला नजरेसमोर धरुन त्यांना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या विधानामुळे समस्त आंबेडकरी विचारधारा मानणार्‍या अन् अनुसूचित जाती प्रवर्गाची बदनामी झाली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (सुधारीत २०१५) अन्वये हा गुन्हा ठरत आहे. रामदेव बाबा याने हे विधान कुठेही केले असले तरी ते विधान ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या संदर्भात कैलास हावळे यांनी, भारतीय राज्यघटना कोणत्याही भेदभावाला थारा देत नाही. घटनेतील कलम १७ मध्ये विशेषतः भेदभावाला संपवण्यात आले आहे. १९८९ साली अनुसूचित जाती आणि जमाती कायदा करण्यात आला, जेणेकरुन भेदभाव करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करता येईल. आता ठराविक जात समूहाला टार्गेट करुन जर असे विधान करण्यात येत असेल तर ते निषेधार्ह आहे. त्यामुळे रामदेव बाबांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी केली.