रस्त्याच्या कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

रस्त्याच्या कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

ठाणे (प्रतिनिधी) :
स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) ठाणे येथील घोडबंदर मार्गावरून दुचाकीने पालकांसोबत जाताना झालेल्या अपघातात वेदांत विक्रम दास या अडीच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. सदर रस्त्याचे अर्धवट केलेले काम व राज्य रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी कामाची तपासणी न करता देयक अदा केल्याप्रकरणी कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने शहरात नुकतीच शांततामय मार्गाने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनावेळी वेदांतला श्रद्धांजली वाहण्यात आली.

सदर आंदोलनात चेतना दीक्षित, अनिल शाळीग्राम, उन्मेष बागवे, विरेंद्र सावंत, मंगेश खातू, रमेश वर्मा, सुभाष ठाकरे, हेमंत शर्मा, शिवाकांत मिश्रा, उमेश मिश्रा, संजीव साने, राजेंद्र यादव, दुर्गेश चौरसिया, शिवकांत यादव, संतोष भोईर, अनंता शिंगे, सुब्रतो भट्टाचार्य यांच्यासह जागरूक नागरिक सहभागी झाले होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. रस्ते विकास महामंडळ त्यांच्या अखत्यारीत काम करते. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांचे विरुद्ध स्वत: गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली पाहिजे. जर त्यांनी अशी भूमिका घेतली नाही तर ते कंत्राटदार व अधिकारी यांना वाचविण्याचे काम करत असल्याचे मानले जाईल, असे ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी वेदांत दास यास दोन मिनिटे शांत उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन कासार वडवली पोलिसांना देण्यात आले. पालकमंत्र्यांनाही सदरचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती अभियानचे उन्मेष बागवे यांनी दिली.