केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी

कल्याण (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेशमधील लखीमपूर मध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत देखील पहायला मिळाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांच्या नेत्तृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांनी कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काळ्या फिती लावून मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात प्रकाश मुथा यांच्यासह कल्याण शहर ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष ओबीसी विभाग जयदीप सानप, उपाध्यक्ष राजा जाधव, बाबा तिवारी, माजी नगरसेवक इफ्तेखार खान, मुन्ना पांडे, विजय चव्हाण, आजम खान, गुलाब मनियार, मदन जयराज, संगीता भोईर, रीना खांडेकर, राम तरे, मंगल चव्हाण, मनोज सिंह आदींसह कांग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता सहभागी झाले होते.

उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरू असून शेतकऱ्यांचे शांतीपूर्ण आंदोलन सुरू असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवत निष्पाप शेतकऱ्यांना चिरडले. एवढे होऊन देखील आरोपींना अटक केली नव्हती. सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारणा केल्यावर उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक केली आहे. 'मोदी सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्वरित पदावरून हटवावे. हरित क्रांती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मोदींना वेळ नाही, मात्र अमेरिकेला जाण्यासाठी वेळ आहे', हे निषेधात्मक असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांनी सांगितले.