आयटीआयच्या विद्यार्थ्यासाठी विशेष परिवहन बस सेवेची मागणी

आयटीआयच्या विद्यार्थ्यासाठी विशेष परिवहन बस सेवेची मागणी

कल्याण (प्रतिनिधी) : उंबर्डे येथील आयटीआयच्या विद्यार्थ्यासाठी विशेष परिवहन बस सेवा सुरू करण्याची मागणी परिवहन सदस्य  सुनील खारूक यांनी परिवहन व्यवस्थापकांना निवेदन देत केली आहे.

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यात आले आहे. या संस्थेत एकूण २५० प्रशिक्षणार्थी विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. तसेच ३० कर्मचारी देखील आहेत. या विद्यार्थ्यांचा प्रवास सोयीसाठी व्हावा यासाठी या मार्गावर या आगोदरच परिवहन उपक्रमाकडून परिवहन बससेवा सुविधा देण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे एप्रिल २०२० पासून हि बससेवा बंद करण्यात आली आहे.

नवीन वर्षात १ जानेवारी पासून प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण नियमित सुरू झाले असल्याने कल्याण रेल्वे स्टेशन ते आयटीआय उंबर्डे या मार्गावर प्रशिक्षणार्थीच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये म्हणून पुन्हा या मार्गावर परिवहन बस सेवा सुरू करणे आवश्यक असल्याने आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी व कर्मचारी यांच्यासाठी या मार्गावर सकाळी ७.३० वा.,९.३० वा. व ११.०० वा. या कालावधीत तीन बस कल्याण रेल्वे स्टेशन ते आयटीआय कल्याण, उबर्डे आणि दुपारी ३.३० वा., ५.३० वा., व ५.४५ वा. या कालावधीत तीन बस आयटीआय कल्याण ते कल्याण रेल्वे स्टेशन पर्यंत सुरु करण्याची मागणी परिवहन सदस्य खारूक यांनी परिवहन व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.