कडोंमपा रुग्णालयातील परिचारिकांना त्यांचे मूळ काम देण्याची मागणी

कडोंमपा रुग्णालयातील परिचारिकांना त्यांचे मूळ काम देण्याची मागणी

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात जी.एन.एम परिचारिकांच्या जागी काही ए.एन.एम. परिचारिकांची करण्यात आलेली नियुक्ती चुकीची असून जी.एन.एम परिचारिकांचे देण्यात आलेले काम काढून घेऊन त्यांना त्यांचे मूळ काम देण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया लेबर्स एम्प्लॉईज युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कोणार्क देसाई यांनी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ए.एन.एम. महिला परिचारिकांनी आरोग्य केंद्र व प्रसूती विषयांचे प्रशिक्षण घेतलेले असते, तर जी.एन.एम. महिला परिचारिकांनी जनरल विभागातही काम करण्याचे प्रशिक्षण घेतलेले असते. त्यामुळे ए.एन.एम. परिचारिकांना जनरल विभागात काम दिले जात नाही. मात्र आरोग्य विभागात जी.एन.एम. परिचारिकांची संख्या कमी असल्याने महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय व डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात जी.एन.एम. परिचारिकांच्या जागी काही ए.एन.एम. परिचारिका नियुक्त करण्यात आल्या असून त्यांच्यावर जनरल विभागात देखील काम करण्याची वेळ आली आहे. ज्या ठिकाणी जी.एन.एम. परिचारिकांची आवश्यकता आहे तेथे ए.एन.एम. परिचारिकांना काम करावयास लावण्याचा अजब प्रकार सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागात सुरु आहे. जनरल विभागातील जोखमीचे काम वाढल्याने त्याचा या ए.एन.एम. परिचारिकांच्या मानसिक स्वास्थावर विपरीत परिणाम होण्याची भीती काही महिला परिचारिकांकडून व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या या चुकीच्या धोरणामुळे रुग्णांना उपचारावेळी त्याचे परिणाम सोसावे लागू शकतात.

ए.एन.एम. परिचारिका आणि जी.एन.एम. परिचारिका यांची कामे भिन्न असून त्यासाठीचे प्रशिक्षण देखील भिन्न आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचार करताना ए.एन.एम. महिला परिचारिकांच्या हातून एखादी चूक झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कोणार्क देसाई यांनी याप्रकरणी वारंवार आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करीत लक्ष वेधले. मात्र त्याची आरोग्य विभागाकडून दाखल घेतली जात नसल्याचे देसाई यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करीत ए.एन.एम. परिचारिकांना त्यांचे मूळ काम देण्यात यावे व त्याबाबतची माहिती आम्हाला द्यावी, अशी मागणी त्यांनी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे एक पत्राद्वारे केली आहे.