केडीएमसीच्या ‘कर्तव्यदक्षते’चे प्रतिक घोषित करण्याची मागणी

केडीएमसीच्या ‘कर्तव्यदक्षते’चे प्रतिक घोषित करण्याची मागणी

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘क’ प्रभाग क्षेत्राच्या हद्दीतील कल्याण रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या जरीमरी नाल्यात सहा महिन्यापूर्वी पडलेले झाड महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याने सहा महिने उलटूनही  नाल्यातच पडून आहे. हे नाल्यात पडलेले महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक-सफाई कर्मचाऱ्यांच्या पर्यायाने महापालिकेच्या ‘कर्तव्य दक्षते’चे प्रतिक म्हणून घोषित करण्याची मागणी येथील प्राणवायू सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

जरीमरी नाला हा कल्याण पश्चिमेतील मुख्य नाला असून याच नाल्याला कल्याण पूर्वेतून येणारा नाला रेल्वे स्टेशनजवळील सर्वोदय गृहसंकुल येथे मिळतो. पुढे तो पत्री पुलाजवळून कल्याण खाडीला जाऊन मिळतो. गत २७ जुलै २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी झुंझारराव मार्केट येथे जरीमरी नाल्याकिनारी असलेले एक झाड उन्मळून नाल्यात पडले. या घटनेला आज सहा महिने उलटून गेले तरी हे झाड नाल्यात तसेच पडून आहे. त्याच ठिकाणी नाल्यात लक्ष्मी भाजी मार्केटमधील भाजीपाला-फळांचा व इतर कचरा दररोज

आणून टाकला जात आहे. हा कचरा नाल्यात जमा होऊन त्या ठिकाणी मिनी डंपिंग ग्राउंड तयार झाल्याचे चित्र आहे. सदर परिसरात साफसफाई करणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, सफाई मुकादम वा सफाई कर्मचाऱ्यांचे याकडे कुठलेच लक्ष नसल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे. महापालिका प्रशासन एकीकडे ‘स्वच्छ भारत अभियाना’चा गाजावाजा करीत असताना सबंधित कर्मचाऱ्यांना हे मिनी डंपिंग ग्राउंड दिसत नसल्याबद्दल कल्याणकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

याप्रकरणी शहरातील प्राणवायू सामाजिक संस्थेच्या संयोजकांनी बुधवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना लेखी पत्र देत सबंधित महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या ‘कर्तव्य दक्षते’चे कौतुक करण्यासाठी नाल्यात पडलेले ‘हे झाड’ महापालिकेच्या ‘कर्तव्य दक्षते’चे प्रतिक म्हणून जाहीर करावे अशी मागणी केली आहे. एकीकडे नालेसफाईवर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असताना या नाल्यात दररोज टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याप्रकरणी महापालिका संबंधितांवर काही कारवाई करण्याची पावले उचलणार का, असा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण झाला आहे.