तीन अपघात होऊनही शिवाजी चौकातील पदपथ विक्रेत्यांकडे, तर पादचारी रस्त्यावर !

तीन अपघात होऊनही शिवाजी चौकातील पदपथ विक्रेत्यांकडे, तर पादचारी रस्त्यावर !

कल्याण (प्रविण आंब्रे) :
सणासुदीच्या काळात पदपथ विक्रेत्यांना व्यवसायासाठी दिले जात असल्याने कल्याण डोंबिवलीतील पादचाऱ्यांवर रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्ष-दोन वर्षात शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकात झालेले तीन अपघात स्मरणात असतानाही शिवाजी चौकातील पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करून देण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. अशातच सत्ताधारी शिवसेना-भाजप करते तरी काय, असा सवाल पादचारी व सुजाण नागरिकांकडून केला जात आहे.

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून बिकट होत चालला आहे. रस्त्यावरील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावरील वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. त्यातच रस्त्यांच्या दुरवस्थेने वाहनचालकांसह नागरिक देखील त्रस्त आहेत. फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे फेरीवाल्यांवर महापालिकेचा कसलाही अंकुश राहिलेला नाही. दुसरीकडे शहरातील पदपथ आणि रस्ते फेरीवाले, विक्रेते, दुकानदार व भाजी-फळ विक्रेत्यांनी व्यापले असल्याचे चित्र सरसकट कल्याण आणि डोंबिवली शहरात पाहायला मिळत आहे. 

अशातच कल्याणमधील शिवाजी चौकातील एका बाजूकडील पदपथ विक्रेत्यांना व्यवसायासाठी मंडप टाकून दिला गेल्याचे दिसत आहे. गणेशोत्सवापासून सुरु झालेली ही परिस्थिती दिवाळीपर्यत तशीच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे बैलबाजार, आंबेडकर रोड व महापालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. या चौकातून जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. या पदपथालगत रस्त्यावरच सकाळी ११ पासून सायंकाळपर्यंत रिक्षांसह मोठी चारचाकी वाहने बिनदिक्कत तासनतास उभी केली जात आहेत. या बेशिस्त वाहनांवर कारवाई कोणी करायची, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यातच पावसात शिवाजी चौकातील महापालिकेच्या दिशेकडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने चालायचे कोठून, असाही प्रश्न नागरीकांना पडला आहे. या परिस्थितीत रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गेल्या वर्षी शिवाजी चौकात दुचाकीवरून पडून झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेचा व लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अद्याप कल्याणकर विसरलेले नाहीत. तसेच पहाटेच्या सुमारास प्रचंड मोठी लोखंडी रिंग वाहून नेणाऱ्या मोठ्या कंटेनर उलटून अपघात झालेला, यात कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाली नसली तरी काही वाहनांचे नुकसान झाले होते. एवढे होऊनही येथील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात महापालिकेसह, वाहतूक शाखा व परिवहन विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. 

पदपथ हवेत पादचाऱ्यांसाठी...

रस्त्यालगतचे पदपथ हे पादचाऱ्यांसाठी मोकळे असावेत असे मा. न्यायालयाचे आदेश असतानाही त्याची सर्रास पायमल्ली होत असताना महापालिका प्रशासन काय करीत आहे, असा सवाल जागरूक नागरिक करीत असून पदपथ हे पादचाऱ्यांसाठी मोकळे ठेवण्यासाठी महापालिकेने योग्य ती कार्यवाही करावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.