युवकांना प्रेरणादायी समाजसेवक धिरेश हरड

युवकांना प्रेरणादायी समाजसेवक धिरेश हरड

कोलाहालात सार्‍या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी ऐकल्यावर व्यक्ती सहज विचार चक्रात गुरफटून जाते. समाजातील व्यक्तीवेध घेणार्‍या ह्या ओळी. माणूस शब्द वापरतांना ह्या ठिकाणी गर्दीतला 'माणूस' म्हणजे मानवी शरीराने तर शोधायचा माणूस 'विशिष्ट गुण' समुच्चय असलेला. माणूस फक्त शरीराने असून चालत नाही तर त्याच्या कडे मानवता हा गुण असावा लागतो. सामाजिक बांधिलकी जपणारा असावा लागतो. असा माणूस मला सापडला. समाजसेवक धिरेश पांडुरंग हरड. त्यांची आणि माझी ओळख आज पासून दहा वर्षापूर्वीची. एक दिवस सहज बस प्रवासात एकमेकाच्या शेजारी बसलो होतो. आणि पुन्हा दोन तीनदा प्रवासात भेट झाली. मग सुरू झाले एकमेकांचे आत्मियतेने चौकशी करणं. त्यांची जी माहिती मला समजली. त्यामध्ये ते समाज सेवक असल्याची पुसटशी कल्पनासुद्धा आली नव्हती. 

मला एव्हढंच त्यांच्याबद्दल माहीत होते. ते एक अभियंता असून टाटा टेलिकॉम ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून काम पहातात. त्यांच्या बोलण्यातून बौद्धिक चातुर्य दिसले. कुठल्याही प्रकारची दिखाऊगिरीव्यतिरिक्त त्यांचे व्यक्तीमत्त्व वाटले. पण संवादामध्ये ते समाज सेवेची लाट तळागाळात घेऊन गेलेत हे अजिबात दिसले नाही. ते माझे फेसबुक मित्रयादीत आहेत. आणि दोन तीन दिवसापुर्वी अचानक मला त्यांच्याबद्दल जाणून घेण्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. त्याचे असे झाले की, त्यांच्या मित्रांनी त्यांना समाजसेवेच्या भरीव योगदानाबद्दल पुरस्कार जाहिर झाल्या संदर्भातील अभिनंदन करणारी पोस्ट त्यांच्या टाईमलाईनवर जोडली. माझ्या संपर्कात दहा वर्षापासून असलेली व्यक्ती आणि ती समाजसेवक. पोस्ट वाचून मी आश्चर्यचकित झालो. आता माझी जिज्ञासा मला स्वस्थ बसू देईना, त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला सुरवात केली.

आता जी माहिती समोर आली ती अचंबित करणारीच. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून धिरेश दादा समाजसेवा करतायत. चांगली गलेलठ्ठ पगाराची कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी. मुळात म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती समाजसेवक असू शकते. ही बाब मनाला न पटणारी पण ते सत्य पाहिले मी. कदाचित मला दुसर्‍या कुणी सांगीतलं असते तर मी विश्वास ठेवला नसता. समाजसेवा पण कशी पगाराचा पैसा वापरून. आज कॉर्पोरेट नोकरी करणारे पाहतो. पैसा खूप कमविता येतो. पण त्याच पैश्याला दिसतात कुठेतरी पळवाटा. उच्च जीवनशैली जगण्याच्या नादात वाढतो कर्जबाजारीपणा. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी जास्त पैसा हवा मग सुरू होते ओव्हर टाईम. कुठेतरी घ्यावा लागतो व्यसनाचा आधार. चंगळवाद पसरला असता दुसर्‍यासाठी झगडणारा माणूस सापडला. कोलाहलातल्या समाजामध्ये दिसला धिरेश हरड सारखा माणूस समाजासाठी जगणारा. बाप बनून हजारो अनाथ मुलींची लग्न लावून त्यांचे कन्यादान करणारा.  कॉर्पोरेट क्षेत्रातला समाजसेवक पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का नाही बसला तर नवलच.

लहानपणी हत्तीला जेवतांना पाहिले होते. तो त्याच्या जेवण करण्याच्या गुणावरून मला खूप आवडला. हत्ती जेवताना प्रथम दोन तीन घास सोंडेनं हवेत उडवून देतो. मग एक घास खातो. पुन्हा दोन तीन घास हवेत उडवतो आणि नंतर एक घास स्वत: खातो. त्याची ही कृती पाहिली तर एखाद्या माणसाला आश्चर्य वाटेल. हत्ती का बरे असा जेवत असेल ?. पण हत्तीची जेवतांनाची कृती सांगत असते. 'माझ्यासारखा बलशाली मोठा जिव अन्नग्रहण करतो. त्यावेळेस वातावरणातील इतर जिवांना सुद्धा अन्न मिळावे.' म्हणून जेवतांना काही घास तो हवेत उडवत असेल. हे हत्तीचे उदाहरण धिरेश यांच्या बाबतींत जुळतांना दिसले.  मंगेश पाडगावरांच्या त्या ओळी त्यांची माफी मागून मला म्हणावेसे वाटते...

कोलाहलात सार्‍या माणूस  मला सापडला
गर्दीत माणसांच्या माणूस मला सापडला !

नोकरीत पण अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. निसर्गदत्त बुद्धिमत्ता प्राप्त अशी ही व्यक्ती. वयाच्या तेराव्या वर्षी इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. ते सांगतात, " ज्यावेळी मी लहान होतो. माझ्या गावातील कुठल्याही समाजातील मित्रांना मी घरी जेवायला घेऊन जायचो. आणि त्यांच्या जोडीला एका ताटात जेवायचो. आज आपण शहरात जातपात मानत नाही. पण गावाच्या ठिकाणी वीस वर्षापूर्वी हे जातपात खूप मानलं जात होते. पण माझ्या घरातील मला कुणी बोलले नाही."

गावातील गरीब लोकांना सबल बनवायला हवे. आणि ते फक्त शिक्षणानं शक्य आहे. हे त्यांना आजोबा स्वर्गीय शंकरराव शिंदे पाटील यानी सांगीतलं. आजोबांच्या ह्या उपदेशाचा त्यांच्या बालमनावर खूप सकारात्मक बदल झाला. तारुण्यातील कमावलेला पैसा त्यांनी समाजसेवेला वापरण्यास सुरवात केली. आज मिळणार्‍या पैश्यात समाधान शोधून सापडत नाही. प्रत्येकाला कमतरता पडणारी बाब म्हणजे पैसाच आहे. पैसा कमविण्यासाठी व्यक्ती स्वत:चे घर सोडून येते. शिक्षण तर जोडीला असते. शिक्षणानं नोकरी मिळवलेली असते. नोकरीत गरजा शमविण्या एव्हढा पैसापण असतो. पण मध्यम वर्ग सोडून प्रत्येक व्यक्ती उच्च मध्यम वर्गाचा हव्यास धरते. त्याचसाठी हवा असतो पैसा. मग उत्पन्नवाढ होण्यासाठी सुखी समाधानी जीवन तारण ठेवावे लागते. सहज विचार करण्यासारखे उदाहरण पहाना. भाड्याचे घर सोडून स्वत:च्या घराचा विचार सुरू होतो. प्रयत्नांना यश येऊन स्वप्न साकारते. मग मोठं घर असावे हा विचार पुढे येतो. चारचाकी वाहन दिसते शेजार्‍याच्या दारात. ह्या सगळ्यात वास्तव आनंदित जीवन जगायचे राहून जाते. ज्या विचाराने पैसा कमवायला प्रेरित झालो असतो. ज्या ऐषोराम करायची वेळ येते. त्यावेळेस वय वाढलेलं असते. वाढते वय आजार घेऊन येते. काय मौज घेणार पैश्याची. पण धिरेश यांनी या सर्व चंगळवादाच्या विचारांना फाटा देत. एका नवीन पाऊलवाटेची सुरवात केली. अनेकांना मार्गदर्शक अशी, सकारात्मक प्रेरणादायी. कदाचित ह्या पाऊलवाटेचा महामार्गही होईल भविष्यामध्ये. अनेक युवकांना प्रेरणा देणारा असा त्यांनी घेतलेला समाजसेवेचा वसा आहे.

भुकेल्या पोटाला अन्न हवेच. म्हणून दरवेळेस कुठेतरी त्यांचा अन्नदानाचा कार्यक्रम हा ठरलेला असतोच. अनाथ आश्रमात जाऊन स्वत:चा जन्मदिन तर ते दरवर्षी साजरा करतात. त्या आश्रमातील मुलं म्हणजे यांची घरातील, स्वत:ची समजून त्यांच्या संगतीत मिष्टान्नाची मेजवानी ते झोडतात. मुलांच्या विविध कलागुणांना विशेष वाव मिळावा म्हणून ते त्यांच्यासाठी गायनाचे शिबिरांचे आयोजन करतात. ह्या कामात त्यांच्या पत्नीचे सहकार्य त्यांना लाभतेच. पत्नी दिक्षीता यांनी धिरेश यांच्या सोबत 'धर्मेच कामेच अर्थेच नाती चरामी' ही शपथ लग्नात सप्तपदीत जी घेतली आहे. आई विमलबाई आणि वडिल पांडुरंग गुरूजी बहीण संगीताताई यांना धिरेशचा अभिमान वाटतो.  धिरेश दादा सांगतात, "मला दोन मुली आहेत दिव्या आणी आंकीता. मला माझ्या मुलींच्या भवितव्याची जी चिंता आहे. त्या अनुषंगाने मी जे काही निर्णय घेतो. जे काही वडिलकीच्या नात्याने माझ्या मुलींसाठी करतो. तोच माझा प्रयत्न असतो समाजातील अनाथ गरीब मुला-मुलींसाठी. मी मुलींसाठी जास्त करतो. कारण मी मुलींचा बाप आहे. म्हणून मला अनाथ मुलींचा बाप बनायला आवडते."

आज अनेक अनाथ आश्रमातील मुलींसाठी त्यांनी मोफट कराटे क्लासेसे सुरू केले. आज मुली शिकत आहेत. प्रगती करत आहेत. स्वत:च्या पायावर ऊभे राहतांना त्यांना नोकरी करावी लागते. तेव्हा घरी जायला त्यांना उशीर होतो. त्यांना स्वत:चे रक्षणार्थ ज्या गोष्टीची गरज आहे ती धिरेश दादांनी ओळखली. त्याच बरोबर समाजामध्ये काही गरीब कुटूंबातील महिला आहेत. त्यांना प्रशिक्षण देऊन शिलाई मशीनचे वाटप किंवा ब्युटिपार्लरचे प्रशिक्षण शिबीर घेऊन महिला सबलीकरणाची सामाजिक जबाबदारी त्यांनी पेलली. UPSC किंवा MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन त्यांनी केले. जेथे जेथे समाजामध्ये उणे दिसते. तेथे तेथे पोहचण्याचे काम धिरेश दादा यांनी केले. एक दिवस समजले दादांना की कुणी साठ वर्ष वयाचे जेष्ठ नागरिक दिव्याच्या उजेडात संपूर्ण वर्तमान पत्र वाचून काढतात. यांनी जाऊन त्यांना विना विजेचा नाईट लॅम्प खरेदी करून दिला. यासाठी त्यांनी पांडुरंग प्रतिष्ठान ही नोंदणीकृत संस्था स्थापन केली. या संस्थेला आयएसओ मानांकन मिळाले असून अशा मानांकित संस्था जिल्ह्यात फारच कमी आहेत. रस्त्यात चालणारा सर्व सामान्य माणूस हातात बॅग. प्रवास कधी रिक्षाने तर कधी बसने. गर्दीत फिरणारा पण माणसांच्या गर्दीत गुणांनी माणूस असणारा. मनामध्ये समाजा प्रति अंतःकरणात तळमळ ठेवणारा. सामाजिकतेचे भान ठेऊन न चुकता दरवर्षी वृक्षारोपण करणारा. अनेक झाड त्यांनी लावलीत. निरंतर भविष्यामध्ये फुलणारी फळणारी. संत ज्ञानेश्वर माउलींचे काही अभंग मला आठवले.

हे विश्वची माझे घर, ऐसी मती ज्याची थोर

ही उपमा धिरेश दादांना खूपच लागू पडते. आजच्या जन्मदिनानिमित्त  ईश्वर त्यांना शारिरीक मानसिक आरोग्य स्थिर देवो. अशी मी भगवंताकडे मागणी करतो. कारण कोलाहालात ह्या समाजसेवक धिरेश पांडुरंग हरड यांच्यासारखी माणसं आहेत म्हणूनच समाज समतोल आहे. अशा या समाज सेवकाचा १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या मोठ्या बंधू मोतीराम (अप्पा) हरड यांच्या आकस्मिक जाण्यामुळे गेल्या ८ वर्षापासून ते आपला वाढदिवस साधेपणात आश्रम शाळांतील गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप व अन्नदान करून करतात. कोणतीही भेटवस्तू वा पुष्पगुच्छ ते स्वीकारत नाहीत. अशा या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! शेवटी एकः म्हणावेसे वाटते...

रंजल्या जिवाची मनी धरी खंत
तोची खरा साधू, तोची खरा संत

लेखक: 
प्रभाकर सुधाकर पवार
कल्याण.