ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या मागण्यांसाठी ठाणे येथे ढोल बजाओ आंदोलन 

ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या मागण्यांसाठी ठाणे येथे ढोल बजाओ आंदोलन 

ठाणे (प्रतिनिधी) : ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या संविधानिक न्याय्य मागण्या मान्य करण्याबाबत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ओबीसी समाजाचे नेते दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे तहसिलदार कार्यालयासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले तसेच तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, अशी माहिती पत्रकारांशी बोलतांना देण्यात आली. 

ओबीसींच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ओबीसी व अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने 8 ऑक्टोबर 2020 रोजी राज्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन सादर करून या समितीच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. ओबीसींचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार असून त्याचाच एक भाग म्हणून सदर निवेदन देण्यात आले, अशी माहिती ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. 

मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी उद्भवलेल्या महाराष्ट्रातील ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परिक्षार्थी आणि सरळसेवा भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. 

शासनाला दिलेल्या निवेदनात काही नवी मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढील जनगणना जातनिहाय करण्यात यावी, ओबीसी या प्रवर्गात मराठा जातीचा समावेश करू नये, पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा व भरती प्रक्रिया विनाविलंब सुरू करण्यात याव्यात आदी मागण्यांचा यात समावेश आहे.