केडीएमसीच्या डम्पिंगवर सापडल्या डिझेलच्या बाटल्या

केडीएमसीच्या डम्पिंगवर सापडल्या डिझेलच्या बाटल्या

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणमधील वाडेघर येथील महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर डिझेलने भरलेल्या बाटल्या आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डिझेलने भरलेल्या या बाटल्या आग लावण्याच्या उद्देशाने की, डिझेल चोरीच्या उद्देशाने, की आणखी काही कारणास्तव येथे ठेवण्यात आल्या होत्या हे स्पष्ट झालेले नाही.

गेल्या आठवड्यात वाडेघर डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागली होती. ही आग पूर्णपणे विझवण्यास अग्निशमन दलाला तब्बल ३ ते ४ दिवस लागले. आग नियंत्रणात आल्यानंतर अग्निशमन दलाकडून या डम्पिंग ग्राउंडवर गेल्या शनिवारी कुलिंगचे काम सुरू होते. त्यावेळी खाडी किनाऱ्याच्या बाजूला ठराविक अंतर राखून या डिझेलने भरलेल्या बाटल्या खोचून ठेवण्यात आल्या होत्या. डिझेलने काठोकाठ भरलेल्या या बाटल्या पाहून अग्निशमन दलाचे कर्मचारी अवाक झाले. त्यांनी यासंदर्भात महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित या प्रकाराची माहिती दिली .

दरम्यान, यासंदर्भात घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला. हा प्रकार खरा असून या डिझलेच्या बाटल्या कचऱ्याला आग लावण्यासाठी होत्या की, चोरीच्या उद्देशाने हे पुढील तपासात समजेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात चौकशी करण्याचे पत्र देणार असल्याचे ते म्हणाले.