दिनेश तावडे भाजपात परतले, पण मूळ सवाल अनुत्तरीतच

दिनेश तावडे भाजपात परतले, पण मूळ सवाल अनुत्तरीतच

कल्याण (प्रतिनिधी) :

कल्याण जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश तावडे दीर्घ काळानंतर स्वगृही भाजपात परतले आहेत. पण ज्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपा सोडला त्या मुद्याचे काय झाले, हा सवाल अनुत्तरीतच राहिला आहे.

तावडे हे अभ्यासू व उत्कृष्ट वक्तृत्वकला असलेले म्हणून ओळखले जातात. संघाचे जुने कार्यकर्ते असलेले तावडे यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून कारकीर्द गाजवली आहे. महापालिकेत व बाहेरही पक्षाचे नेतृत्व करताना त्यांनी आपला ठसा उमटवला होता. साधारणत: २००० साली भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातून पक्षासाठी गोळा झालेला निधी हा पक्षाकडे जमा झाला काय हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. तो निधी पक्षाकडे जमा झाला असल्यास मी पक्ष सोडणार नाही असेही त्यांनी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला सांगितले असल्याची माहिती आहे. पण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही म्हणून तावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेले.

२००४ ची महापालिका निवडणूक त्यांना मनसेतर्फे लढवायची इच्छा होती, परंतु विश्वसनीय सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, ज्या भाजप नेत्याचा तावडे यांना विरोध होता त्यानेच तावडे यांना तिकीट न देण्याची मनसे नेत्यांना गळ घातली व ती मान्य झाली. आणि आता तावडे स्वगृही परतले असले तरी त्यांनी उपस्थित केलेला मूळ मुद्दा अनुत्तरीतच आहे.