विस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी अखेरपर्यंत सोडवू- डॉ. विजय सूर्यवंशी

विस्थापित कुटुंबांच्या घरांचा प्रश्न फेब्रुवारी अखेरपर्यंत सोडवू- डॉ. विजय सूर्यवंशी

डोंबिवली (प्रतिनिधी) : दत्तनगर प्रभागातील घरांपासून वंचित राहिलेल्या विस्थापित कुटुंबांच्या हक्काच्या घराचा प्रश्न फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत सोडवू, अशी ग्वाही कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी डोंबिवली येथे बोलताना दिली. भारताच्या ७२ प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा राष्ट्रध्वज डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर येथील संकलतिर्थ येथे फडकवण्यात आला. त्यावेळी शिवेसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश गोवर्धन मोरे यांनी दत्तनगर प्रभागातील विस्थापित कुटुंबांच्या हक्काच्या घराची समस्या आयुक्तांच्या समोर मांडली असता त्याला प्रतिसाद देताना आयुक्तांनी वरील आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमाला स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आभारप्रदर्शनासाठी उभे राहिलेल्या राजेश मोरे यांनी आपल्या दत्तनगर प्रभागातील २४१ विस्थापित कुटुंबे कित्येक वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत असल्याचा प्रश्न महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला. बोगस लाभधारक व एकापेक्षा अधिक घरे काही लाभार्थ्यांनी घेतल्याच्या कारणामुळे बीएसयुपी योजनेतील घरे उर्वरित अनेक लाभार्थ्यांना देण्याचा प्रश्न भिजत पडला होता. त्याचा फटका आपल्या प्रभागातील नागरिकांनाही बसला असून त्यांना १०-१२ वर्षांपासून नाहक भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. प्रशासन येथील २४१ पात्र विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न लगेच सोडवू शकते, हेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याला प्रतिसाद देतांना सूर्यवंशी यांनी या विस्थापित कुटुंबांच्या हक्काच्या घराचा प्रश्न फेब्रुवारी अखेरपर्यंत सोडवू, अशी ग्वाही दिली. त्यावर उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला.