शहापूरच्या दुर्गम भागातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना ब्लँकेट्स-स्वेटरचे वाटप

शहापूरच्या दुर्गम भागातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना ब्लँकेट्स-स्वेटरचे वाटप

कल्याण  (प्रतिनिधी) :
शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील दुर्गम डोंगराळ भागातील निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा हिवाळ्यात पडणाऱ्या थंडीपासून बचाव व्हावा यासाठी ‘जेथे गरज, तेथे मदत’ हे ध्येय मानून वाटचाल करणाऱ्या कल्याण येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या वतीने तेथील २९० विद्यार्थ्यांना ब्लँकेट्स आणि स्वेटरसह शालेयोपयोगी साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.

खर्डी रेल्वे स्थानकापासून १६ किमी अंतरावर दुर्गम भागात शासकीय निवासी आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत आसपासच्या गावातील, पाड्यावरील सुमारे २९० विद्यार्थी १ ली ते ७ वीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. ही आश्रमशाळा म्हणजे एक खोली असून त्या खोलीतच येथील हे सर्व विद्यार्थी निवास करतात. या आश्रमशाळेसाठी इमारत मंजूर झाली असली तरी प्रत्यक्षात या इमारतीचे काम सुरु झाले नसल्याचे सांगण्यात येते. या परिस्थितीत हिवाळ्याच्या दिवसात तेथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा थंडीपासून बचाव व्हावा यासाठी कल्याण येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धीरेश हरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू, उत्तम दर्जाचे स्वेटर आणि ब्लॅंकेट याचे नुकतेच आश्रमशाळेला भेट देऊन वाटप केले. यावेळी मुख्याध्यापक मानव वाघ हे उपस्थित होते. हरड आणि त्यांचे सहकारी विद्यार्थांशी दिलखुलास गप्पा व त्यांना  मार्गदर्शन करण्यात आले. अतुल माळी, बाळाराम भावार्थे, एजाज शेख, भाग्यवंत काळे, सचिन वाघमारे, निशांत म्हात्रे, भावेश गोयंका, अमित मेहता, आलोक खरे, प्रकाश प्रजापती हेही हजर होते.

जिथे खरोखर गरज तिथे थेट मदत पोहोचवण्याचे काम आम्ही पांडुरंग प्रतिष्ठानच्या वतीने करीत आहोत. आजोबा-वडिलांनी आम्हा कुटुंबीयांवर गरीब गरजू व्यक्तीला मदत करण्याचा संस्कार केले आहेत. ‘एव्हरी पर्सन इज अॅन इलीमेंट ऑफ अवर लाईव्हज’ हा मुलभूत विचार या संस्कारामागे आहेत. संबंधितांच्या चेहेऱ्यावर दिसणारे समाधानातून मला अधिक सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याची भावना धीरेश हरड यांनी ‘कोकण वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केली. यापूर्वी मी माझा दोन वेळा वाढदिवस साजरा याच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करीत साजरा केल्याचे त्यांनी यावेळी आठवणीने सांगितले.