जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांना प्रतिबंध करावा - आरोग्यमंत्री

जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांना प्रतिबंध करावा - आरोग्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : 
राज्यात स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो यांसारख्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून प्रत्येक रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. राज्यात साथीच्या आजारांवरील औषधांचा साठा मुबलक प्रमाणात असून स्वाईन फ्लूवरील प्रभावी टॅमीफ्लूच्या सुमारे नऊ लाख गोळ्या राज्यात उपलब्ध आहेत, असा दिलासा देतानाच सर्वच जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी टीमवर्कने काम करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे दिले.

आरोग्य भवनमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आरोग्य अधिकाऱ्यांशी शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्याच्या सर्व जिल्ह्यातील आरोग्य, महसूल, महापालिका यांच्या समन्वयातून स्थानिक पातळीवर साथरोगाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यंत्रणांच्या अडचणी समजावून घेतानाच त्याबाबत शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबद्दल माहिती देताना आरोग्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की, या आढावा बैठकीत राज्यातील स्वाईन फ्लू, डेंग्यू, मलेरीया, लेप्टो आदी साथीच्या आजारांबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. स्वाईन फ्लूची लक्षणे दिसताच उपचाराला विलंब करू न करण्याचे स्पष्ट निर्देश खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्राने स्वाईन फ्लूवरील उपचाराचा आणि रुग्ण व्हेंटीलेटवर ठेवण्याचा जो प्रोटोकॉल तयार केला तो देशात सर्वोत्तम असून केंद्र शासन त्याचा अंगिकार करून संपूर्ण देशात लागू करणार असल्याची माहिती आरोग्यमत्र्यांनी यावेळी दिली.

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांसोबतच जनजागृती मोहिम हाती घेण्याचे निर्देश महापालिकांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य, महापालिका, जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाय करावेत सोबत आयएमए यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील अन्य संस्थांची मदत घेण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. राज्यात स्वाईनमुळे जानेवारी ते जुलै यादरम्यान १९२ मृत्यू झाले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात डेंग्यूचे १५५६ रुग्ण असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती केंद्र नष्ट करण्यासाठी महापालिकांनी मोहिम हाती घेतली पाहिजे. यासंदर्भात मुंबई महापालिकेमार्फत मुंबई महापालिका अधिनियमातील कलम ३८१प्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाते त्याचप्रमाणे अन्य महापालिकांनी कारवाई करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले. अर्धवट बांधकामे असतील तेथे पाणी साचून डासांची उत्पत्ती होते, अशावेळी नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करण्याची सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी केली.