दिव्यांगांनी नावनोंदणी करून शासनाच्या सुविधांचा लाभ घ्यावा- रेखा चौधरी

दिव्यांगांनी नावनोंदणी करून शासनाच्या सुविधांचा लाभ घ्यावा- रेखा चौधरी

कल्याण (प्रतिनिधी) :
दिव्यांगांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण व दिव्यांग कल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी यांनी केले. आचार्य अत्रे रंगमंदिरातील कॉन्फरंस सभागृहात समितीच्या वतीने आयोजित केलेल्या दिव्यांगांचे संमेलन व नोंदणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

चौधरी पुढे म्हणाल्या की, दिव्यांगासाठी असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी समिती कटिबद्ध आहे. शासनाने दिव्यांगांसाठी उत्पन्नाची निर्धारित केलेली मर्यादा दोन लाखांवरून पाच लाख रुपये करावी अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली. महापालिका प्रशासनाच्या सकारात्मकतेमुळे सुमारे ७०० अपंगांना योजनेचा लाभ मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाला नगरसेविका प्रमिला पाटील, संगीता गायकवाड, सुनंदा कोट, श्रीमती शीतल मंढारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

समितीच्या सदस्या शकीला खान यांनी शासनाने घरांकरिता अपंगासाठी ठेवलेल्या तीन टक्के आरक्षणातून घरे देण्याबाबत आगामी महासभेत आपण विषय घेऊ असे सांगितले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना रेखा चौधरी यांनी समितीच्या वतीने दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगत त्यांना महापालिकेच्या परिवहनच्या प्रवासाची सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली.