डोंबिवलीत दिवाळी फराळाचे साहित्य १ रुपयात वितरीत

डोंबिवलीत दिवाळी फराळाचे साहित्य १ रुपयात वितरीत

डोंबिवली (प्रतिनिधी) : शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून फक्त १ रुपया प्रति रवा, मैदा, साखर दिवाळी सणानिमित्ताने वाटपाचे आयोजन गोपीनाथ चौक डोंबिवली पश्चिम येथे नुकतेच करण्यात आले होते. यावेळी आसपासच्या अनेक प्रभागातील हजारो नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. 

कोरोना महामारीत लोकांचे काम-धंदे बुडाले तर दुसरीकडे महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले असून सामान्य कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत नेहमीच शिवसेना गोर गरिबांच्या पाठीशी राहून २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करून सहकार्य करीत असते. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून  गोर-गरिब नागरिकांची दिवाळी गोड जावी यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांना १ रुपया प्रति रवा, मैदा आणि साखरेचे वाटप करण्यात आले. समाजसेवक गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे यांच्या, तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फराळ वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी तब्बल साडेचार ते पाच हजार नागरिकांना हे साहित्य फक्त १ रुपया प्रति किलो प्रमाणे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात जनतेच्या आर्थिक संकटात देखील शिवसेनेने अन्न-धान्यांचे वाटप केले होते. यापुढेही शिवसेना सदैव जनतेसोबत राहील, असा विश्वास बाळा म्हात्रे यांनी यावेळी दिला. यासमयी माजी नगरसेविका कविता म्हात्रे, युवासेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे, अश्विनी म्हात्रे, विभागप्रमुख संदीप सामंत  त्याचबरोबर समस्त महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते.