माळशेज घाट रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी करा: गडकरी यांच्याकडे मागणी 

माळशेज घाट रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी करा: गडकरी यांच्याकडे मागणी 

कल्याण (प्रतिनिधी) :
कोविड१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. असे असले तरी महत्वाची व तातडीची कामे करण्याची असलेली आवश्यकता लक्षात घेता कल्याण-मुरबाड-माळशेज-अहमदनगर-निर्मल या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ वरील माळशेजघाटातील रस्ता सुरक्षिततेच्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्याची मागणी ‘कोंकण वृत्तांत’ने केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहनमंत्री नितीन गडकरी यांना इमेल पाठवून केली आहे
.

कल्याण-मुरबाड-माळशेज-अहमदनगर-निर्मल या मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ हा लांब पल्ल्याचा राष्ट्रीय महामार्ग आहे. कोकण आणि घाट माथ्यावरील जिल्ह्यांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग असून महाराष्ट्रातील प्रमुख घाट मार्ग आहे. आळेफाटा, नाशिक या भागातून भाजीपाला, फळे, घाटावरील दुध निर्मिती कारखान्यांतून दुध व दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात मुंबई-ठाण्यासह अन्य कोकण परिसराला या मार्गानेच पुरविला जातो. सबंधित वाहनांचा प्रवास हा अधिकतर रात्रीचा होत असतो. 

माळशेज घाट रस्ता (राष्ट्रीय महामार्ग) अवघड, धोकादायक व अपघाती वळणमार्ग असल्याने यापूर्वी या घाटात अनेक मोठे अपघात घडलेले आहेत. त्याची नोंद शासकीय दफ्तरात आहेच. ३-४ वर्षापूर्वी राज्य परिवहन महामंडळाची बस खोल दरीत कोसळून घडलेल्या मोठ्या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची घटना आजही लोकांच्या स्मृतीत आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात येथील अपघातांची शक्यता अधिकच वाढते. येथे पावसाळा-हिवाळ्यात दिवसा आणि रात्रीच्या वेळेत मोठ्या प्रमाणात धुकेही पसरलेले असते. या बाबी लक्षात घेता या राष्ट्रीय महामार्गावरील, विशेषत: माळशेज घाटातील सुरक्षित प्रवासासाठी या घाटातील -रस्त्याची दुरुस्ती, दिशादर्शक फलक-वाहतूक चिन्हे इ., डोंगरावरून कोसळणारे दरड-दगडी यांच्या संरक्षक जाळ्या इत्यादी विविध प्रकारची कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने-त्वरेने करून घेण्याकडे या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. 

लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने माळशेज घाटातील अपघातांची संभाव्यता व धोका कमी होऊन जीवितहानी व एकप्रकारे राष्ट्रीय संपत्तीची हानी टाळण्यासाठी याबाबत तातडीने संबंधितांना निर्देश देण्याची मागणी ‘कोंकण वृत्तांत’ने गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगांमधून रस्त्यांवरील घाट मार्ग आणि अन्य रस्त्यांची, घाटातील दुरुस्ती, दिशादर्शक फलक-वाहतूक चिन्हे इ., डोंगरावरून कोसळणारे दरड-दगडी यांच्या संरक्षक जाळ्या इत्यादी कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदना इमेल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.