कोकणातील पूरग्रस्तांना डोंबिवली शिवसेनेची भरघोस मदत

कोकणातील पूरग्रस्तांना डोंबिवली शिवसेनेची भरघोस मदत

डोंबिवली (प्रतिनिधी) : कोकणात पावसाच्या अतिवृष्टी व पुरामुळे कोकणवासीयांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी जीवितहानी झाली तर हजारो कुटुंबांना त्याचा फटका बसला. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे-मुंबईतील असंख्य सामाजिक-राजकीय संघटनांनी कोकणाकडे धाव घेतली. डोंबिवली शहर शिवसेनेच्या वतीने महाड, खेड, चिपळूण भागातील पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवून त्यांचे वितरण करण्यात आले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देत शिवसैनिकांच्या साथीने गरजू कुटुंबांपर्यंत मदत साहित्याचे वितरण केले.

महाड, खेड, चिपळूण भागातील अतिवृष्टी व पुरामुळे कोकणात हाहाकार उडाल्याचे वृत्त येताच शिवसेनेने कोकणात मदत साहित्य पटविण्याचा सपाटा लावला. मुंबई-ठाणे जिल्ह्यातून असंख्य सामाजिक-राजकीय संघटनांनी पूरग्रस्त कोकणवासीयांच्या मदतीसाठी धाव घेतली. नगरविकासमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिस्तबद्ध नियोजनाखाली खा. श्रीकांत शिंदे आणि शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांनी शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने महाड, खेड, चिपळूण भागातील पूरग्रस्त गावांतील पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक साहित्याचे असंख्य ट्रक भरून साहित्य शहरातून पाठविले.

खा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे आणि त्यांच्या सहकारी पदाधिकारी-शिवसैनीक, युवा सैनिकांनी कोकणातील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, तेल, बिस्कीट, चटई, चादरी, ब्लॅंकेट्स, सॅनिटरी पॅड व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे किट्स घेऊन १७ ट्रक्स, बीस्लरी पाण्याचे बॉक्स घेऊन एसटी महामंडळाची कार्गो बस असा सुमारे ८० टनपेक्षा अधिक मदतसाहित्य घेऊन कोकणात धाव घेतली. ही मदत प्रत्यक्ष महाड, खेड, चिपळूण भागात खासदार शिंदे, राजेश मोरे यांनी स्वत: जाऊन पोहोचविली. या दरम्यान, आमदार भास्कर जाधव हेही त्यांचे सोबत होते. ठाणे माजी महापौर संजय मोरे, ठाणे उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक दिपेश म्हात्रे, राजेश कदम, नगरसेवक अरुण आशान, विश्वनाथ राणे शहर शाखेचे तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी त्यांचे सोबत होते. त्यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देत स्थानिक शिवसैनिक, नागरिकांच्या मदतीने गरजू कुटुंबांची भेट घेत त्यांना जातीने वितरीत केली. पूरग्रस्त नागरिकांची त्यांनी जातीने विचारपूस केली. ज्या कुटुंबातील व्यक्ती दगावल्या त्यांच्या कुटुंबियांना भेटून मोरे यांनी त्यांचे सांत्वन केले.

पत्रकारांना मदत...

चिपळूण येथील पत्रकार बांधवांची देखील भेट घेतली. या आपतग्रस्त आणि प्रतिकुल परिस्थितीत देखील शहरातील घडामोडी तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कुठल्याही बाबतीची तमा न बाळगता रस्त्यावर उतरून काम करत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या सर्व पत्रकार बांधवांचे खासदार शिंदे यांनी कौतुक करत त्यांना मेडिकल किटचे तसेच त्यांच्या कुटुबियांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने पूरग्रस्त बांधवांकरिता आरोग्य शिबीर सुरु करण्यात आली. या मोफत आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी नंतर रुग्णांना लागणारी औषधे मोफत दिली जात आहेत.

कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवली शहर शाखेने मदतीची हाक देताच शहरातील व्यापारी-व्यावसायिक, उद्योजकांनी मदत कार्यात सढळ हाताने सहाय्य केले. अन्नधान्य व इतर जिन्नस देणाऱ्या डोंबिवलीतील दानशूर व्यक्ती-नागरिकांचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी आभार मानले आहेत.