रायगड जिल्ह्यातील गावठाण जमिनींचे ड्रोनव्दारे होणार सर्व्हे

रायगड जिल्ह्यातील गावठाण जमिनींचे ड्रोनव्दारे होणार सर्व्हे

अलिबाग (प्रतिनिधी) : गावठाण भूमापन प्रकल्प योजनेत भारतीय सर्व्हेक्षण विभाग (सर्व्हे ऑफ इंडिया) मार्फत जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनव्दारे गावठाणातील मिळकतीचे सर्व्हे करण्यात येणार असून नागरिकांनी ड्रोनव्दारे सर्व्हेसाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनव्दारे गावठाणातील मिळकतीचे सर्व्हेबाबतच्या नुकत्याच संपन्न झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमिलेख अधिकारी सचिन इंगळी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. बैनाडे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील एकूण महसूली गावे १ हजार ६९६ व वाडया/पाडे १ हजार १८७ असे एकूण २ हजार ८८२ गावठाणाचे स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण होणार आहे. त्याअनुषगांने भूमी अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग व महसूल विभाग, पोलीस विभाग, नगर रचना विभाग यांची संयुक्त बैठक पार पडली आहे.  ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करताना ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, व भूमापक यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या शासनाच्या परिपत्रकात दिल्या असून त्याप्रमाणे प्रत्येकाने आपआपली कामे जबाबदारीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपस्थित संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. ड्रोनव्दारे गावठाण भूमापन योजनेवेळी नागरिकांना तसेच ग्रामपंचायतींना होणाऱ्या लाभाबाबत माहिती देण्यात यावी. बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांना गावठाण भूमापन योजना राबविणे व यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य व जबाबदाऱ्या पार पाडव्यात, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीमध्ये जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड सचिन इंगळी यांनी ड्रोन सर्व्हेक्षणाव्दारे गावठाण भूमापन करण्यासाठी स्वामित्व योजनेंतर्गत करावयाच्या कार्यवाहीबाबत उपस्थित विभागप्रमुखांना सविस्तर माहिती दिली. तसेच ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करावयाच्या कार्यपध्दतीचे ध्वनीचित्रफितीव्दारे प्रबोधन करण्यात आले.