शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यामुळे धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना मिळाले पाणी

शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यामुळे धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना मिळाले पाणी

डोंबिवली (प्रतीनिधी) : डोंबिवली पूर्वेतील संगीतावाडी १, संगीतावाडी २ आणि सरोजस्मृती या तीन इमारती धोकादायक असल्याने शुक्रवारी महापालिका प्रशासनाने या इमारतींचे पाणी कनेक्शन कट केल्याने तेथील रहिवाशांचे हाल होऊ लागले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मोरे यांच्याकडे आपली समस्या मांडली. मोरे यांनी त्वरेने महापालिका प्रशासनाची भेट घेत सदर इमारतींचे पाणी कनेक्शन पुन्हा जोडून दिले. 

धोकादायक इमारत आणि या इमारतीत राहणारे भाडेकरू यांच्यात घरे खाली करण्यावरून कायम वादाची परिस्थिती असते. दुसरीकडे महापालिका प्रशासन धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना घरे रिकामे करण्याची नोटीस बजावते. तसेच वेळप्रसंगी त्या इमारतींचे पाणी कनेक्शन देखील कट करते. वर्षोनुवर्ष या इमारतीत राहिलेले  रहिवाशी आपल्या पुन्हा घर मिळणार नाही या काळजीने धोका पत्करून तेथेच राहतात. नियमाप्रमाणे धोकादायक इमारतीत रहिवाश्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना त्या इमारतीत राहू दिले जात नाही. त्यांना तशी नोटीसही बजावली जाते. असाच प्रकार डोंबिवली पूर्वेकडील  संगीतावाडी १, संगीतावाडी २ आणि सरोज स्मृती या तीन धोकादायक इमारती शुक्रवारी पालिका प्रशासनाने पाणी कनेक्शन कट केले. पाण्या अभावी हाल होऊ लागलेल्या रहिवाश्यांनी सेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. 

मोरे यांनी त्वरित रहिवाश्यांना बरोबर घेऊन महापालिकेच्या डोंबिवलीतील विभागीय कार्यालयात 'ग' प्रभाग क्षेत्र अधिकारी स्नेहा करपे यांची भेट घेतली. चर्चेअंती सदर इमारतीचे कट केलेले पाणी कनेक्शन पुन्हा जोडण्याची विंनती मोरे यांनी केली. त्यांच्या विनंतीला मान देत इमारतीचे कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले. याबाबत राजेश मोरे यांना विचारले असता ते म्हणाले, शिवसेना सदैव जनतेच्या बाजूने राहिली आहे. इमारत मालकाने या रहिवाश्यांना घरे दिली नाहीत तर शिवसेना आपल्या पद्धतीने रहिवाश्यांना न्याय मिळवून देईल. धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना बेघर होऊ देणार नाही, असे आश्वासनही मोरे यांनी यावेळी रहिवाश्यांना दिले. शिवसेना आपल्या पाठीशी उभे असल्याचे पाहून रहिवाश्यांनी यावेळी शिवसेनेचे आभार मानले.