मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनाने खेडमधील पत्रकारांचे उपोषण स्थगित

मुख्यमंत्र्यांच्या लेखी आश्वासनाने खेडमधील पत्रकारांचे उपोषण स्थगित

खेड (प्रतिनिधी) :
खेड तालुक्यामधील अवैध धंद्यांविरुद्ध बातमी देणाऱ्या पत्रकारांवर काही समाजकंटकांनी गेल्या आठवड्यात हल्ला केला. याप्रकरणाची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्याने खेड शहरातील पत्रकारांनी खेड प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत या समाजकंटकांविरोधात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय येथील पत्रकारांनी घेतला होता. अखेरीस उपोषणाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पत्रकारांनी हे उपोषण तूर्त स्थगित केले आहे.

खेड शहर आणि तालुका हद्दीतील मटका व जुगार धंद्यांविरोधात वृत्तपत्रात लिखाण केल्याचा रागातून काही समाजकंटकांनी खेड येथील पत्रकारांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तालुक्यातील पत्रकारांनी सबंधित समाजकंटकांविरोधात तडीपारीसह मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली. त्याचप्रमाणे अशा गुंड प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या पोलीस निरीक्षकांची खातेनिहाय चौकशी करून बदली करण्याची मागणी करीत सिद्धेश परशेट्ये, अनुज जोशी व अजित जाधव यांच्यासह सहकारी पत्रकारांनी प्रांत कार्यालयासमोर पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले होते. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनाच्या काळात भेट घेऊन पत्रकारांच्या आंदोलनाची माहिती दिली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने सदर प्रकरणी कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले. युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांनी सदर आदेशाची प्रत उपोषणकर्त्या पत्रकारांना दिली व त्यांच्या हस्ते अनुज जोशी आणि सहकाऱ्यांना सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर प्रभू, सतीश कदम, प्रमोद पेडणेकर, राकेश शिंदे, मकरंद भागवत, सिद्धेश परशेटे, अनुज जोशी, किशोर साळवी, हर्षल शिरोडकर, देवेंद्र जाधव, अजित जाधव, मंदार आपटे, चंद्रकांत बनकर, ज्ञानेश रोकडे, संतोष आंब्रे, संजय विचारे, माजी नगरसेवक संजय मोदी, राजेश बुटाला, मिनार चिखले, प्रेमळ चिखले, अबू चिखले, रविराज चिखले आदी उपस्थित होते.