मोदी सरकारच्या काळात दलित-मुस्लिमांवर दडपशाही वाढली - सुजात आंबेडकर

मोदी सरकारच्या काळात दलित-मुस्लिमांवर दडपशाही वाढली - सुजात आंबेडकर

कल्याण (प्रतिनिधी) :
भाजपचे मोदी सरकार देशात आल्यापासून दलित मुस्लिमांवरील दडपशाहीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वंचित आघाडीच्या माध्यमातून अश्या जातीयवादी व मनुवाद्यांना धडा  शिकविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेबांचे पणतू तथा प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी कल्याणात केले. ते सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यात बोलत होते.

कल्याण पूर्वेकडील लोकग्राममध्ये रविवारी सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या संवाद मेळाव्याला  डॉ.  बाबासाहेबांचे पणतू आणि प्रकाश आंबेडकरांचे पुत्र युवानेते सुजात आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सुजात आंबेडकर पुढे म्हणले की, वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन ह्या संघटना कुण्या एका जाती किंवा धर्माचे नसून ते सर्वांचे आहे. त्यामुळे वंचित आणि सम्यक विद्यार्थी संघटनेत सर्व धर्माच्या आणि जातींच्या लोकांना जोडत चला असे आवाहन त्यांनी केले. तसेच मोदी सरकार आणि कॉंग्रेसवरही त्यांनी हल्ला चढवला. वंचित बहुजन आघाडीला भाजपची "बी टीम" म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित चांगली कामगिरी करेल असेही ते म्हणाले. सुजात आंबेडकरांना पाहण्यासाठी तसेच संवाद साधण्यासाठी विद्यार्थीवर्ग आणि आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. 

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र सचिव महेश भारतीय, प्रदेश प्रवक्ता दिशा पिंकी शेख, प्रदेश प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतिक साबळे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हर्षाली गवई, आणि स्वागताध्यक्ष रुपेश हुंबरे इत्यादींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमधून संघटनेच्या विद्यार्थ्यांनी याठिकाणी हजेरी लावली. सुजात आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक नव्या विद्यार्थ्यांनी संघटनेत प्रवेश केला.