तगड्या बंडखोरांमुळे कल्याणमधील दोन मतदारसंघात निकालांची उत्सुकता 

तगड्या बंडखोरांमुळे कल्याणमधील दोन मतदारसंघात निकालांची उत्सुकता 

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण शहरातील चारपैकी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेनेच्या उमेदवाराला भाजप बंडखोर नरेंद्र पवार तर कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील भाजपच्या उमेदवाराला शिवसेना बंडखोर धनंजय बोडारे या तगड्या उमेदवारांचे आव्हान असल्याने या दोन मतदारसंघातील लढतींकडे चर्चेच्या ठरल्या असून कल्याणकरांना येथील निकालांची उत्सुकता लागली आहे.

कल्याण पश्चिम : या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाई (आ) महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश भोईर तर भाजपचे बंडखोर उमेदवार नरेद्र पवार या तिघांमध्ये मुख्य लढत असली तरी कॉंग्रेसच्या कांचन कुलकर्णी, वंचित बहुजन आघाडीचे नरेश गायकवाड, जागरूक नागरीक संघटनेच्या संजीथा नायर, संभाजी ब्रिगेडच्या डॉ. नीता पाटील यांच्यासह अन्य उमेदवारही मैदानात आहेत.

कल्याण पूर्व : या विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीकडून भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश तरे तर शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे या तिघांमध्ये मुख्य लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीच्या अश्विनी धुमाळ यांच्यासह अन्य उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

कल्याण ग्रामीण : या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाई (आ) महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील या दोघांमध्ये मुख्य लढत आहे. अन्य उमेदवारही येथे आपले नशीब अजमावत आहेत.

डोंबिवली : या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप-रिपाई (आ) महायुतीकडून भाजपचे उमेदवार रविंद्र चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंदार हळबे, राष्ट्रीय कॉंग्रेसच्या राधिका गुप्ते यांच्यात लढत होत आहे. अन्य उमेदवारही येथे निवडणूक रिंगणात आहेत.