सुधागड-पाली येथे निवडणुक आणि पावसामुळे खरेदीवर परिणाम !

सुधागड-पाली येथे निवडणुक आणि पावसामुळे खरेदीवर परिणाम !

सुधागड-पाली (परेश शिंदे) :
महाराष्ट्रात सध्या निवडणूक असल्यामुळे सर्वत्र प्रचार आणि रॅली यांचेच वातावरण दिसत आहे. सुधागड तालुक्यात  देखील सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. दिवाळी आता फक्त १० ते १५ दिवसावर येवून ठेपली असली तरी बाजारात नेहेमीची धावपळ आणि उलाढाल मात्र बघायला मिळत नसल्याने बाजारातील खरेदीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे व्यापारीवर्गात अनुत्साह पसरल्याचे चित्र दिसत आहे.

दिवाळी येण्याच्या अगोदर १५ ते २० दिवस अगोदरच बाजारपेठा दिवाळीच्या सामानांनी, रोषणाईच्या लाईट्सने, कपड्यांची दुकाने कपड्यांनी आणि किराणा मालाची दुकाने लोकांनी फुलून जातात. यावर्षी मात्र कमालीची मंदी असल्याचे तालुक्यातील सर्व व्यापारी आता खुलेआम बोलू लागले आहेत. एकतर बाजारात असलेली अभूतपूर्व मंदी आणि दिवाळीच्या तोंडावर आलेली दिवाळी यामुळे बाजारात एक प्रकारची मरगळ आली असल्याचे बाजारात वातावरण आहे. निवडणूक २१ तारखेला झाल्यानंतर २४ तारखेला निकाल लागल्यानंतर मात्र बाजारात रेलचेल चालू होईल अशी अपेक्षा व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात करीत आहे. 

यंदाचा गणेशोत्सवाचा काळ अतिपावसामुळे वाया गेल्याने आधीच काळजीत असलेले व्यापारी जर दिवाळीत बाजारात उठाव न झाल्यास हवालदिल होतील हे नक्की. दरवर्षी तालुक्यामध्ये दिवाळीच्या आधी शेतकरी भाताची कापणी पूर्ण करून भात खरेदीविक्री केंद्रात विकून आपआपल्या कुटुंबाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात परंतु यावर्षी अतिपावसामुळे आणि पावूस लांबल्याने भातकापणीला अजूनही सुरवात नझाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत. 

भात कापणी अजून नझाल्यामुळे यावर्षी दिवाळी आधी पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आहे. भातकापणीला अजून १० दिवस थांबावे लागेल असे दिसते त्यामुळे यावर्षी दिवाळी बहुधा बेतानीच साजरी करावी लागणार, असे वाटते, अशी प्रतिक्रिया किशोर चव्हाण या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.