केडीएमसीच्या व्यापारी संकुलाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य

केडीएमसीच्या व्यापारी संकुलाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य

कल्याण (प्रविण आंब्रे) : कल्याण डोंबिवली शहरातील डम्पिंगच्या निमित्ताने कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) मालकीच्या कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या आवारात असलेल्या कर्मयोगी कै. शंकरराव झुंझारराव व्यापारी संकुलाच्या आवारात कचऱ्यासह, दुकानदार-भटक्यांचे साहित्य व पालापाचोळ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत कचरा वर्गीकरणाचा आग्रह धरणाऱ्या महापालिका प्रशासनाचे  व्यापारी संकुलाच्या आवारातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

कल्याण पश्चिमेत महापालिकेच्या मालकीचे कर्मयोगी कै. शंकरराव झुंझारराव व्यापारी संकुल असून या संकुलाच्या आवारातच महापालिकेचे अत्रे नाट्यगृह आहे. नाट्यगृहाच्या परिसरात नियमित साफसफाई, स्वच्छता राखली जात असली तरी याच आवारात असलेल्या व्यापारी संकुलाच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. 

व्यापारी संकुलाच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. सर्वत्र झाडांचा पालापाचोळा इस्तत: पसरलेला असून त्यामध्येच दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहेत. लगतच्या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या काही फेरीवाल्यांनी, भटक्यांनी त्यांचे साहित्य संकुलाच्या आवारात ठेवल्याचे दिसून येत आहे. संकुलातील जीन्यांखाली देखील असे साहित्य ठेवले गेले आहे. 

व्यापारी संकुलाच्या आवारात काही भंगार अवस्थेतील दुचाकी रिक्षा ही वाहनेही काही वर्षांपासून पडून असल्याचे दिसून येत आहेत. एकंदरी व्यापारी संकुलाच्या देखभाल व साफसफाईकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. महपालिका प्रशासन नागरिकांना स्वच्छतेचे धडे एकीकडे देत असताना महपालिकेच्याच व्यापारी संकुलात कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.