राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत पर्यावरणपूरक उपक्रम

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत पर्यावरणपूरक उपक्रम

डोंबिवली (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे नेते तथा आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाने मनसे डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीकर नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला. यंदा राज ठाकरेंचा ५३ वा वाढदिवस असल्याने १०५३ फुलझाडांचे वाटप मनसे डोंबिवली शहरातर्फे करण्यात आले.

गेली दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असताना हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊन पुर्वीप्रमाणेच लोकांचे जीवन उत्साहाने भारलेले, टवटवीत, सुगंधी व रंगीबेरंगी व्हावे यासाठी गुलाब, मोगरा, जास्वंद अशी फुलझाडांचे वाटप करीत ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा सामाजिक संदेश देण्यात आला. सदर उपक्रम राबविल्याचे मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी सांगितले.

डोंबिवलीकर नागरीकांनी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी केवळ १ तासात तब्बल १०५३ रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मनसे शहर संघटक योगेश रोहिदास पाटील यांनी विशेष सहकार्य केले.