शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री रामदास कदम

शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची - पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई (प्रतिनिधी) : 
वातावरणीय बदलामुळे तापमानात प्रचंड वाढ झाल्याने हवेमध्ये कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची असल्याचे मत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले. हॉटेल ताज पॅलेस येथे आज प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी आणि मुंबई फर्स्टतर्फे आयोजित ‘शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक दळणवळण’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कदम पुढे म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा गुणवत्ता अभ्यासाकरिता नीरी या संस्थेमार्फत राज्यातील निवडक शहरातील हवा प्रदूषणाच्या स्त्रोतांचा विश्लेषणात्मक अभ्‍यास अहवाल तयार केला आहे. त्यात वाहन प्रदूषण हे हवा प्रदूषणाचा प्रमुख स्त्रोत असल्याचे अनुमान काढले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमानुसार योग्य तो कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. विविध शहरातील एकूण हवा प्रदूषणाच्या अंदाजे ३० टक्के प्रदूषण हे वाहनामुळे होते असे लक्षात आले असून त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहेत.

गेल्या वर्षी प्लास्टिक बंदीबाबतचा निर्णय घेतला. लोकसहभागामुळे तो यशस्वी ठरत आहे. आता हवा शुद्ध राहण्यासाठी प्रदूषणावर कशी मात करायची यासाठी पर्यावरण विभाग वेगवेगळे उपाय करीत आहे. भारतात सर्वात अधिक प्रदूषण दिल्ली शहरात आहे. तेथे रस्त्याच्या प्रमुख ठिकाणी धूलिकण आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषणारी यंत्रे बसविली आहेत. मुंबई शहरातही अशी यंत्रणा राबविली जाईल, असेही कदम यांनी सांगितले.

प्रारंभी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले. मुंबई फर्स्टचे सचिव नंदन मालुसे आणि मुंबई महानगर विकास आयुक्त ए. राजीव यांनी शुद्ध हवा कार्यक्रमासंदर्भात आपल्या भाषणातून अधिक विवेचन केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन यांनी आभार मानले.