बंदी असलेल्या प्‍लास्‍टीकचा वापर होत असल्याचे कडोंमपाच्या कारवाई दरम्यान उघड

बंदी असलेल्या प्‍लास्‍टीकचा वापर होत असल्याचे कडोंमपाच्या कारवाई दरम्यान उघड

कल्‍याण (प्रतिनिधी) : 
जून २०१८ पासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. तेव्हापासून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अविघटनशील प्लास्टिकच्या वस्तू बाळगणाऱ्यांवर कारवाई सातत्याने केली जात असली तरी महापालिका हद्दीत बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे महापालिकेने सोमवारी केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. गिऱ्हाईक परत जाण्याच्या भीतीने फेरीवाल्यांकडूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरुच आहे.

महाराष्‍ट्र प्‍लास्टिक थर्माकोल अविघटनशील वस्‍तूबांबत शासनाने लागू केलेल्‍या अधिसूचनेनुसार महापालिका क्ष्‍ोत्रात सर्वत्र एकल वापर प्‍लास्टिक निर्मूलनाची मोहिम सुरू आहे. अशा प्लास्टिकचे उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक इत्यादीबाबत या मोहिमेंतर्गत कारवाई केली जात आहे. सोमवारी या मोहिमेअतंर्गत आयुक्तांच्या निर्देशानुसार प्‍लास्टिक निर्मूलन मोहिमेला गती देण्यासाठी प्रत्‍येक प्रभागनिहाय पथक तयार करून सकाळी १० वाजल्‍यापासुन प्रत्‍येक प्रभागातील सहकारी गृहनिर्माण संस्‍था, व्‍यापारी संकुल, भाजी मार्केट, फेरीवाले, शाळा, कॉलेज, शहरातील शासकिय कार्यालये, हॉटेल, लॉज येथे प्‍लास्टिक व थर्माकोल जमा करण्‍याची कार्यवाही करण्‍यात आली.

सदर कारवाई दरम्यान महापालिकेतील सर्व १२२ प्रभागांतून मिळुन एकूण १०१२ किलो प्‍लास्टिक जमा करण्‍यात आले. तसेच संबंधितांवर केलेल्या दंडाच्या कारवाईतून एकुण ३ लाख ५ हजार रुपयांची वसुली करण्‍यात आली. प्लास्टिक बंदी लागू होऊन १७ महिने उलटूनही अद्याप अशा बंदी असलेल्या अविघटनशील प्लास्टिकचा वापर काही दुकानदाराकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे गिऱ्हाईक परत जाण्याच्या भीतीने फेरीवाल्यांकडूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर करण्यात येत आहे. त्यांना प्रतिबंध करण्यात अद्याप महापालिकेला यश आले नसल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

सदर मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्‍त उमाकांत गायकवाड, सहा. आयुक्‍त गणेश बोराडे, सहाय्यक सार्वजनिक आरोग्‍य अधिकारी विलास जोशी, आगस्‍तीन घुटे यांच्यासह सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी, प्रमुख आरोग्‍य निरिक्षक, आरोग्‍य निरिक्षकासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.