एफ कॅबीन रस्ता काँक्रीटीकरणाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपात जुंपली

एफ कॅबीन रस्ता काँक्रीटीकरणाच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपात जुंपली

कल्याण (प्रतिनिधी) : एफ कॅबीन रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असताना हा रस्ता सोमवारपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला. मात्र या रस्त्याचे शिवसेना आणि भाजपने स्वतंत्रपणे लोकार्पण करीत या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. श्रेय घेण्यासाठी या दोन्ही पक्षात जुंपल्याने ऐन थंडीत देखील कल्याण डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे.

कल्याण-पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा धर्मवीर आनंद दिघे पुलाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे आणि एफ कॅबीन रोड ते आंबेडकर चौक वालधुनी पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महापालिकेकडून करण्यात आले. एमएमआरडीएच्या चार कोटी ३५ लाख निधीतून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जवळपास एक महिना हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना भरपूर त्रास सहन करावा लागला अखेर रस्त्याचे काम झाले. आता या रस्त्याचा श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप आमने सामने आले आहेत.

आज (सोमवारी) सकाळी ९ वाजता उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते धनंजय बोडारे, माजी महापौर तथा नगरसेवक रमेश जाधव, विधानसभा संघटक शरद पाटील, उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे, नगरसेवक महेश गायकवाड, राजाराम पावशे, पुरुषोत्तम चव्हाण, नगरसेविका स्नेहल पिंगळे आदींच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन करण्यात आलं. माजी नगरसेवक शरद पाटील यांनी रस्त्याच्या कामासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त यांना धन्यवाद दिले आहे. कामाचं श्रेय आता कोणालाही घेऊ द्या. लोकांना माहिती आहे काम कोणी केलं आहे. पालकमंत्र्यांचे आदेशानंतर आज आम्ही रस्त्याचे उद्घाटन केले आहे. या रस्त्याच्या उद्घाटनानंतर नागरिकांच्या त्रास आता कमी होणार असल्याचे शरद पाटील यांनी यावेळी सांगतिले.

शिवसेनेच्या कार्यक्रमानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की, हा रस्ता माझ्या पाठपुराव्याने आणि भाजपचे सरकार असताना निधी मंजूर करण्यात आला होता. आम्ही उद्घाटन करणार होतो, त्यापूर्वी काही लोकांनी उद्घाटन केले. खरं दाखवा निधी तुम्ही आणला का? असा सवाल उपस्थित करत कोणाच्याही बापाला आपला बाप बोलायचे आणि नारळ फोडायचे अशी घणाघाती टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे. भाजपचे कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला जिल्हा अध्यक्षा रेखा राजन चौधरी, सुभाष म्हस्के, लक्ष्मण आंबोकर, रवी हराळे, अर्चना नागपुरे, विजय उपाध्याय, प्रिया जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आजच्या या रस्त्याच्या श्रेयवादामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलंच तापले आहे.