ठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना सुविधा

ठाण्याच्या केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थ्यांना सुविधा

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांना दोन  वेळेच्या जेवणाची भ्रांत असताना आपल्या मुलांचा उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे येथील केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज विनामुल्य भरुन देतानाच गरजू विद्यार्थ्यांना काही सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.

बारावीच्या शालांत परिक्षेत उत्तम गुण मिळवून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे प्रथम वर्षासाठी प्रवेश घेता येत नाही. महाविद्यालयाची फी एकरकमी भरता येत नसल्याने काही विद्यार्थ्यांनी तर यावर्षी गॅप घेण्याचे ठरविले आहे. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ठाण्याच्या  केबीपी वरिष्ठ महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. यावेळी महाविद्यालयाने जवळपास ३०० विद्यार्थ्यांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज विनामुल्य भरुन दिले.

तसेच प्रवेशावेळी नाममात्र फी आकारुन उरलेल्या फिसाठी ४ ते ५ मासिक हप्ते करुन दिल्याने विद्यार्थ्यांची आणि पर्यायाने पालकांची आर्थिक अडचण दुर झाल्याने विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केला. केबीपी महाविद्यालयामध्ये बी.ए व बी.कॉम या पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत बी.कॉम अकाउंटींग अँड फायनान्स, बी.कॉम बँकिग अँड इन्शुरन्स व बी.एस.सी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे व्यावसायिक अभ्यासक्रमसुध्दा उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सांस्कृतिक, क्रिडा, सेमिनार्स, कॉनफरन्सेस, अभ्यास दौरे, नेचर क्लब, मेंटरशिप प्रोग्राम, रोटरेॅक्ट क्लब, राष्ट्रीय सेवा योजना, व इतर अनेक उपक्रम राबविले जातात.

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उपलब्ध करुन दिलेल्या या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपण महाविद्यालयाचे संकेतस्थळ kbpcollegethane.net वर भेट देऊ शकता किंवा प्रा. संतोष गावडे यांना ९९६७७४६५०८ / ०२२ २५८२७७९९ या क्रमांकांवर संपर्क साधू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.