शेतकरी संघटनांच्या ‘भारत बंद’ला कल्याणमधील संघटनांचा पाठींबा 

शेतकरी संघटनांच्या ‘भारत बंद’ला कल्याणमधील संघटनांचा पाठींबा 

कल्याण (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने कृषि विषयक पारित केलेल्या तीन कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी मंगळवार, दि. ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंद’ची हाक दिली आहे. कल्याणमधील विविध संघटनांनी या बंदला पाठींबा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे यांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना केले आहे. त्यानुसार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने भारत बंद’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे सभापती कपिल विष्णू थळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ठाणे जिल्हा किसान सभेच्या समवेत वतीने समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने नुकतेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. किसान सभेच्या वतीने गुरुवार, दि. १० डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कल्याण येथे नागरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे किसान सभेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष कॉ. आत्माराम विशे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड पक्ष, मराठा क्रांती मोर्चा यांच्यासह मराठा सेना संघटनेने देखील मंगळवारच्या भारत बंदला जाहीर पाठींबा दिला आहे. मराठा सेनेचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद मोरे यांनी कल्याण येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटनांच्या झालेल्या बैठकीत आपला पाठींबा घोषित केला आहे. यावेळी मराठा सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, प्रदेश संघटक रविंद्र कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी व शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी शेतकरी आंदोलन व भारत बंदला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने पाठींबा जाहीर केला आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांनी या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी केले आहे.