शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार, कामगारांचे हित जोपासणार- मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार, कामगारांचे हित जोपासणार- मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शेतकऱ्यांच्या समोर सतत कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकऱ्यांना या समस्येतून कायमस्वरूपी कसे मुक्त करता येईल याकडे लक्ष देण्यात येईल. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे २९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १८ हजार ९८० कोटी रुपये रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त करण्यात आले आहे. मागील दहा वर्षात झाली नाही एवढी विक्रमी म्हणजे ४१८ लाख क्विंटल कापूस खरेदी यावर्षी शासनाने केलेली आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, किसान हरितक्रांती करतात तर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. त्याचबरोबरीने आपले कामगार सुद्धा उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळत असतात. म्हणून कामगारांच्या हिताकडेही शासन तितकेच लक्ष देईल. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘महाजॉब्ज’ हे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग येतील. कामगारांना रोजगार उपलब्ध होईल. जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल असे त्यांनी स्पष्ट केले.