विद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी उपोषण 

विद्यार्थ्यांची छळवणूक करणाऱ्या शाळांवर गुन्हे दाखल करण्यासाठी उपोषण 

कल्याण (प्रतिनिधी) :
शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणाऱ्या शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याची सबंधित शाळांकडून छळवणूक केली जात असून अशा शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी गुरुवारी कल्याण येथे शिक्षण आरोग्य अधिकार मंचाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

शिवाजी चौक येथे आयोजित लाक्षणिक उपोषण शिक्षण आरोग्य अधिकार मंचाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅड. नितीन धुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी एकही पैसा घ्यायचा नाही. अशा विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य, गणवेश इत्यादी शालेय साहित्य मोफत पुरवायचे आहे. शासनाने देखील याबाबत वेळोवेळी आदेश दिलेले असताना अनेक शाळा या नियमांचे कल्याण आणि परिसरातील अनेक शाळा उल्लंघन करीत आहेत असा आरोप शिक्षण आरोग्य अधिकार मंचाने केला आहे. शिक्षण हक्क कायद्यातील या संबंधीच्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी मंचाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येत आहे. महापालिका उपयुक्त मिलिंद धाट यांनीही अशा शाळांची मान्यता रद्द करण्याचे सुतोवाच केले होते. मात्र त्यानंतरही शहरातील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. काही शाळांनी तर पैसे भरले तरच विद्यार्थ्यांना शाळेत घेऊ असा पवित्रा घेतला आहे.

शाळेतील मुलांमध्ये भेदभाव करणे, त्यांना शाळेत येण्यास मज्ज्जाव करीत असून हा फौजदारी स्वरूपाचा  गुन्हा असतानाही सबंधित अधिकारी अशा शाळांविरोधात गुन्हे दाखल का करीत नाहीत, असा सवाल धुळे यांनी केला आहे. शाळा सुरु होऊन एक महिना झाला तरी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वा गणवेश दिला गेलेले नाही. विद्यार्थी त्याच परिस्थितीत शाळेत जात असल्याचे धुळे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड, उमेश कांबळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी या उपोषणात सहभागी होत आपचा पाठींबा दिला. 

येत्या काही दिवसात शिक्षण आरोग्य अधिकार मंचाच्या वतीने जिल्हास्तरीय संघर्ष मेळावा आयोजित करीत शासनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या शाळांविरोधात लढा तीव्र करण्यात येईल. तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती याप्रसंगी मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, शिष्टमंडळाने कल्याण पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.