अखेर ‘पत्रीपूल’  वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ लोकार्पण

अखेर ‘पत्रीपूल’  वाहतुकीसाठी खुला; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ लोकार्पण

कल्याण (प्रतिनिधी) : बहुचर्चित ठरलेला पत्रीपूल आज अखेर तीन वर्षांनी जनतेसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन पद्धतीने या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. १०४ वर्षे जुना असलेला हा ब्रिटीशकालीन पत्रीपूल २०१८ मध्ये धोकादायक झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आ. रविंद्र चव्हाण, आ. विश्वनाथ भोईर, आ. गणपत गायकवाड, आ. राजू पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या  उड्डाणपूल अर्थातच नविन पत्रीपूलाचे धुमधडाक्यात लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी या उड्डाणपुलाचे आई तिसाईदेवी उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काम करताना एखाद्याच्या तंगड्यात तंगडं घालून पुढे जाऊ द्यायचे नाही आणि दुसरीकडे नावेही ठेवायची. नावं ठेवणं ही सोपी गोष्ट असून अशा व्यक्तींनी आपले नाव कशाला दिले जाईल ? आपण चांगले काम केले तर आपले नाव इतिहासात कसे जोडले जाईल ? आपले पुढे काय होणार याचाही विचार केला पाहीजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. विकासकामे मग ती केंद्राची असो की, राज्य सरकारची. त्यातील अडथळे दूर होणे महत्त्वाचे असून कोणत्याही पातळीवर आपल्यात ‘तू तू मै मै’ होता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नविन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरडीसी अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करत अत्यंत विक्रमी वेळेमध्ये उड्डाणपुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तर या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवा, असे मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना सूचित केले.

जुना पत्रिपुल हा १०४ वर्षाचा होता त्यामुळे त्याची इतिहासात गणना होते. उद्घाटन झालेला हा नवीन पत्रिपुल १०० वर्ष टिकेल, असे डॉ श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हंटले. नवीन पूल उभरताना अनेक अडचणी समोर आल्या. त्यांना तोंड देत काम सुरू ठेवले.. पूल पूर्ण होणार आहे की नाही? किती दिवस लागणार आहेत ? याचा फायदा अनेकांनी घेतला. डेडलाईन फेब्रुवारी महिन्याची होती. ९  महिन्यात पूर्ण केले यात केडीमसी अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. काटई येथील पुलाचे काम सुरू झाल्यानंतर येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी होणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, कल्याणसह डोंबिवलीकरांसाठी पत्रीपुल हा अत्यंत महत्त्वाचा होता. त्याचे काम सुरू असल्याने गेल्या ३  वर्षांपासून नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता पत्रीपुलाचे लोकार्पण झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
 
पत्रीपुलाच्या नावावरून शिवसेना-भाजपा आमनेसामने

पत्रीपुलाला माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलम यांचे नाव देण्यात यावे याबाबत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्र दिले आहे. त्याबाबत विचार करावा, असे भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी भाषण करताना म्हटले. त्याच्या या वक्तव्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये कुजबुज सुरू झाली. मात्र त्यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रीपूलाचे नाव ‘श्री तिसाई देवी उड्डाणपूल’ असे देण्यात आले असल्याचे सांगत खा. पाटील यांच्या सूचनेवरून सुरु झालेली कुजबुज संपुष्टात आणली. यावरून पत्रीपूलाला काय नाव द्यावे यावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आल्याचे दिसून आले.