आधारवाडी कारागृहातील कैदी, पोलीस कुटुंबांना कोविशील्डची पहिली लस

आधारवाडी कारागृहातील कैदी, पोलीस कुटुंबांना कोविशील्डची पहिली लस

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याणच्या आधारवाडी मध्यवर्ती कारागृहातील १९०७ कैद्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने कोविशील्ड लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आले आहे. यावेळी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांनी देखील लसीकारणात सहभाग घेतला. अशा प्रकारे आधारवाडी कारागृहाने राज्यात सर्वप्रथम लसीकरणाचा पहिला टप्पा  पूर्ण केला आहे. 

कोरोना काळात कैद्यांना थेट कारागृहामध्ये घेतले जात नाही. येणाऱ्या कैद्यांना प्रथम डॉन बॉस्को शाळेत विलगीकरण कक्षात ठेवले जाते. येथील विलगीकरण कक्षातील १४० कैद्यांना देखील कोवीशील्डची पहिली मात्रा देण्यात आली आहे. कारागृहात कोरोना संसर्गा संदर्भात दक्षता घेतली जात असून येथील कैद्यांनासह कारागृहातील बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या १४३ पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना देखील पहिली लस देण्यात आली आहे. राज्यातील कारागृहात आधारवाडी कारागृहाने सर्वप्रथम लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण केल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली आहे.

न्यायालयाकडून कस्टडी सुनावल्यानंतर कैद्यांना कारागृहात शिक्षेसाठी पाठविले जाते. कोरोना संसर्गामुळे कारागृहातील कैद्यांकरिता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने कारागृहातच कोवीशील्ड लसीकरणाची टप्प्याटप्प्याने मोहीम राबविण्यात आली होती. सजा भोगत असणारे तसेच कच्चे कैदी असे एकूण १९०७ जणांचे लसीकरण करण्यात आले. कारागृहातील १४३ बंदोबस्तासाठी तैनात असणारे पोलीस तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील कोवीशील्ड लस देण्याची काळजी घेण्यात  आल्याचे सांगण्यात आले.