पाचशे, दारू, साडी आणि बल्याणी रस्त्यावरील खड्डे 

पाचशे, दारू, साडी आणि बल्याणी रस्त्यावरील खड्डे 

कल्याण (प्रतिनिधी) : ‘५०० मे बिक जाओगे, ऐसा ही रोड पावोगे’, ‘दारू के लिये बिक जाओगे, ऐसा ही रोड पावोगे’, ‘मुर्गी के लिये बिक जाओगे, ऐसा ही रोड पावोगे, ‘साडी के लिये बिक जाओगे, ऐसा ही रोड पावोगे’ अशा अनोख्या घोषणा देत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने बल्याणी प्रभागात आंदोलन करण्यात आले. बल्याणी फाटा येथे रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष वेधत करण्यात आलेल्या अनोख्या घोषणांनी हे आंदोलन शहरात चर्चेचा विषय ठरले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. करदात्यांचा पैसा चुकीच्या पद्धतीने वापरला जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवली महानगरचे अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी याप्रसंगी केला. यावेळी सीमा तिवारी, मिथिलेश झा,

संदीप नाईक, संगीता जैस्वार, वैष्णवी शिर्के, अलका जोशी, उमेश परब, आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कंत्राटदारांच्या मदतीने स्थानिक लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करत असून खड्ड्यांनी भरलेले रस्ते हे त्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे. भ्रष्ट पक्षांचे उमेदवार दरवेळेस निवडणुकीच्या वेळी निवडणुकीच्या दरम्यान विविध आमिषे दाखवतात, पैसे वाटतात, दारू व चिकनची पार्टी देऊन आपले मत विकत घेतात. अशा भ्रष्ट पक्षांना मत न देता प्रामाणिक पक्षांना मत द्यावं, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कल्याण डोंबिवलीमधील आम आदमी पक्षाने अभिनव आंदोलन सुरु केले असून महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी अशी आंदोलने करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.