कल्याणमधील गरजू कुटुंबांना शिवसेनेकडून अन्नधान्याची मदत 

कल्याणमधील गरजू कुटुंबांना शिवसेनेकडून अन्नधान्याची मदत 

कल्याण (प्रतिनिधी) :
कोरोना व्हायरस मुळे पसरणाऱ्या कोविड १९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक जिनसा संपल्यामुळे त्यांची आबाळ होत असल्याने शिवसेना त्यांच्या मदतीसाठी धावली असून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून मतदारसंघातील गरजू नागरिकांना अन्नधान्य इत्यादीची मदत करण्यात येत आहे.

शहरातील विविध संघटना-दानशूर नागरिक गरजू कुटुंबाना मदत करीत आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे याच्या सूचनेनुसार गरजू कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक जिनसांची मदत करण्यात येत आहे. कल्याण शहरातील विविध भागातील रोजंदारी तसेच गरीब कुटुंबांना घरातील अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू संपल्याने उपासमारीची वेळ आली. त्यांच्या मदतीसाठी अनेक दानशूर व्यक्ती-संस्थांनी पुढाकार घेतला असून शिवसेनाही या गरजूंना मदत करण्यात पुढे आहे. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, शहाड, आंबिवली, टिटवाळा या भागात शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख तथा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून ही मदत पोहोचवली जात आहे. 

त्याचप्रमाणे कल्याण शहर शिवसेनेच्या वतीने अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या शहरातील शासकीय-निमशासकीय तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना दररोज हजारो कर्मचाऱ्यांना अन्नवाटप करण्यात येत आहे. यानिमित्ताने आमदार भोईर यांनी, कोरोना विरुद्धच्या या लढ्यात नागरिकांनी संयमाने लढावे. अकारण घराबाहेर पडू नये. शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या निर्देशांचे पालन करावे व कुटुंबासह आपण सुरक्षित राहावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे.