वन खात्याने तोडले घरकुल, श्रमजीवी संघटनेने दिले बांधून!

वन खात्याने तोडले घरकुल, श्रमजीवी संघटनेने दिले बांधून!

टिटवाळा (प्रतिनिधी) : कल्याण पंचायत समितीच्या अखत्यारीत येत असणाऱ्या चवरे-म्हासरोंडी येथील आदिवासी महिलेने पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या अनुदानातून वन खात्याच्या बांधलेल्या एका घरावर वनविभागाने हातोडा मारून तिला बेघर केले होते. श्रमजीवी संघटनेने एकाच दिवसात श्रमदानातून तोडलेले घर पुन्हा बांधून दिले आहे.

चवरे-म्हासरोंडी ग्रामपंचायत हद्दीत अनुदानातून घरकुलाचे बांधकाम करीत असलेल्या सावित्री बबन फसाले या आदिवासी महिलेचे बांधकाम वनविभागाने ८ जून रोजी तोडले होते. आपल्या चार मुलांसह ती बेघर झाल्याने या कारवाईविरोधात श्रमजीवी संघटनेचा बिर्‍हाड मोर्चा दहागाव येथील कार्यालयावर आयोजित करून संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांनी करून २५ जून रोजी आहे त्या जागेवर श्रमदानातून घर बांधून देण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यानुसार शुक्रवारी श्रमजीवी संघटनेच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी एकत्र जमत श्रमदानातून तोडण्यात आलेल्या घराची उभारणी केली. 

श्रमजीवी संघटनेने विटा, सिमेंट, रेती, खिडकी, दरवाजे, पत्रे यांची आधीच व्यवस्था करून ठेवली होती. शुक्रवारच्या सुमारास परिसरातील अनेक पाड्यातील बहुसंख्येने आलेल्या महिला पुरुष यांनी श्रमदानातून घरकुल एका दिवसात बांधून दिल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस राजेश चन्ने यांनी दिली आहे. या वेळी कल्याण तालुका अध्यक्ष विष्णू वाघे, कातकरी घटक प्रमुख वासुदेव वाघे, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे, धाकळू शेळके, लक्ष्मी वाघे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अनुदानातून उभे करण्यात आलेल्या घरकुलावर हातोडा मारीत सावित्रीबाई फसाले हिला  पावसाच्या दिवसात कुटुंबियांसह उघड्यावर पाडणाऱ्या दहागाव येथील वनविभागाच्या कार्यालयातील वनाधिकारी व कर्मचाऱ्यांवर फसाले यांनी श्रमजीवी संघटनेमार्फत टिटवाळा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देण्यात आले होते. श्रमजीवी संघटनेने श्रमदानातून आदिवासी महिलेला घर बांधून दिल्यानंतर पोलिस आता काय कारवाई करणार, याकडे श्रमजीवी संघटनेचे लक्ष लागले आहे.