बल्याणी येथे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी स्वखर्चाने बसविले विद्युत पोल

कल्याण (प्रतिनिधी) : टिटवाळा येथील बल्याणी प्रभागातील बल्याणी टेकडीवरील बॅनरनाका ते मानस चाळ रस्त्यावर ७ विद्युत वाहक पोल स्थानिक नगरसेविका नमिता मयूर पाटील व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी स्वखर्चाने नुकतेच बसविले. या कामाचे उद्घाटन मयूर पाटील यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आले.
यावेळी यावेळी कल्याण ग्रामीण शिवसेनेचे सचिव नामदेव बुटेरे, रईस, अल्ताफ गुजर, कृष्णा दळवी, समीर गायकवाड, सतीश गायकर, हजरत मौलवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. बॅनरनाका ते मानस चाळ परिसरात विद्युत पुरवठा होत नसल्याने येथे विद्युत वाहक पोल बसविण्याची मागणी येथील राजे श्री छत्रपती कोकण प्रतिष्ठान आणि स्थानिक नागरिकांनी मयूर पाटील यांची भेट घेऊन केली होती. त्यानुसार येथे विद्युत पोल बसविण्यासाठी नगरसेविका नमिता पाटील व मयूर पाटील यांनी महावितरणकडे पाठपुरावा केला. अखेरीस पाटील दाम्पत्याने नागरिकांची विजेची समस्या सोडविण्यासाठी स्वखर्चाने सात विद्युत वाहक पोल बसवून दिले.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना मयूर पाटील यांनी, ‘तुमच्या समस्या माझ्याकडे घेऊन या मी त्या निश्चित सोडवेन’, असा शब्द दिला. परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न पूर्णपणे सोडवू. त्यासाठी चार सफाई कर्मचारी वाढवून घेतले आहेत. त्यामुळे प्रभागातील साफसफाईच्या कामाला आणखी गती येईल. बल्याणी टेकडीवरील रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी स्थानिक नागरिक हजरत मौलवी यांनी आजी-माजी नगरसेवक असलेल्या पाटील दाम्पत्याच्या कामाचे कौतुक केले. आपल्या कामाच्या जोरावर मयूर पाटील यांनी आमदार-खासदार व्हावे. संसदेत आपल्या विभागाचे प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा व्यक्त करीत आम्ही त्यांना तन-मन-धन आणि मते देऊन निवडून देऊ, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तीन दिवसांपूर्वी विद्युत वाहिनी दुरुस्तीचे काम करताना मृत्युमुखी पडलेला बल्याणी प्रभागातील कंत्राटी कामगार मुशीर खान याला श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजे श्री छत्रपती कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप घाणेकर, मनीष लोंढे, गणेश वागजे, सचिन गायकवाड, महेश पाटील आदींनी परिश्रम घेतले. यासमयी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.