गणपती बाप्पा, मंत्री-नेते आणि खड्डे

गणपती बाप्पा, मंत्री-नेते आणि खड्डे

नेमेची येतो पावसाळा तसे आता खड्ड्यांचे झाले आहे- ‘नेमेची पडतात खड्डे’ असे आता म्हटले जाते. एवढी खड्डयांची समस्या गंभीर होत आहे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास कल्याण डोंबिवली शहरातील रस्ते आणि त्यावर प्रतिवर्षी पडणारे खड्डे यांचे घ्यावे लागेल. रस्ते कितीही चांगले बनवले तरी पावसाळ्यात त्यावर खड्डयांचे साम्राज्य उभे राहते. या खड्डयांमुळे होणारे अपघात हेही दरवर्षीची एक समस्या होऊन बसले आहेत. खड्डयांतून वाहने हाकता हाकता त्यांची पार वाट तर लागतेच, आणि वाहनचालक आणि प्रवाशांना शारीरिक त्रास, आजार जडतात ते निराळेच अशी एकंदरीत निव्वळ खड्डयांमुळे उद्भवणारी समस्या उग्र रूप धारण करते. गेल्या अनेक वर्षापासून खड्डयांची समस्या उग्र होऊन राहिली आहे. हे खड्डे वेळच्या वेळी बुजवण्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणावे तसे लक्ष देत नाहीत, याचाच दुसरा अर्थ सरळ दुर्लक्ष करतात.

गणेशोत्सव हा दरवर्षी पावसाळ्या दरम्यानच येणारा लोकप्रिय सण. आधी रस्त्यांवर खड्डे पडतात, कधी ते बुजवले जातात तर कधी अधिकारी ते बुजवण्याचे नावच घेत नाहीत. त्यातही बरेचदा गणेशोत्सवाचे निमित्त पुढे करून खड्डे बुजवण्यासाठी निव्वळ कंत्राटे काढण्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी-अधिकारी यांचा कल असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. अनेकदा तर महापालिकेच्या महासभांमध्ये काही स्थानिक लोकप्रतिनिधी व सबंधित अधिकाऱ्यांची अभद्र युती असल्याचेच चित्र पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गणेशोत्सवा पूर्वीच्या महासभेत रस्त्यांवरील खड्डयांचे प्रकरण चांगलेच वाजले. सबंधित बांधकाम विभागाच्या कलाकार कार्यकारी अभियंत्याला त्याबाबत निवेदन करण्याची मागणी व आग्रह एका नगरसेवकाने केली. मात्र त्याच्याच पक्षाच्या काही नगरसेवक-नगरसेविकांनी अशा पद्धतीने त्यावर चर्चा घडवून आणली की, ‘त्या’ कार्यकारी अभियंत्याला महासभेसमोर येऊन निवेदन करण्याची वेळच येऊ दिली गेली नाही. त्याच्या ऐवजी वरिष्ठ असलेल्या शहर अभियंत्याला निवेदन करण्यासाठी पाचारण केले गेले. मुळात खड्डयांना जबाबदार कोण त्या विभागाचा कार्यकारी अभियंता की त्याचा वरिष्ठ? असा संभ्रम निर्माण करून मुद्याला बगल देण्याचे कसब अवगत असलेले लोकप्रतिनिधी ज्या शहराला लाभतात ते शहर स्मार्ट कसे होणार, आणि कधी होणार, हा प्रश्न शिल्लक राहतोच.

खड्डयांशी सबंधित आणखी एक  बाब म्हणजे, रस्त्यांवर पडलेले खड्डे कसे बुजवायचे? त्यासाठी काही शास्त्रीय पद्धती आहे का, ही बाब आधी महापालिकेच्या, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांनी स्पष्ट केली पाहिजे. त्याची माहिती प्रसारमाध्यमांतून जनतेसमोर आणायला हवी. त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे जबाबदार असलेले प्रमुख अधिकारी आपली ही जबाबदारी एकदा तरी पार पाडणार आहेत का? बांधकाम विभागातील अभियंत्यांनी एकदा आपणा कोणत्या दर्जाचे अभियंते आहोत हे पुन्हा एकदा तपासून घ्यायला हवे.

नुकतेच पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या नवीन वास्तूचा लोकार्पण सोहोळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडला. मुख्यमंत्री प्रत्यक्ष पालघरमध्ये जाऊन त्या वास्तूचे लोकार्पण करणार होते. त्यासाठी त्यांच्या मार्ग असलेला रस्त्याची डागडुजी देखील करण्यात आली होती अशी बातमी होती. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यासह अन्य तालुक्यांमधून नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व अन्य भाजप नेत्यांची जनआशीर्वाद यात्रा निघाली. अक्षरशः अनेक ठिकाणी खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून या यात्रेने मार्गक्रमण केले. कल्याण डोंबिवली महापालिकेत येणाऱ्या बल्याणी येथून टिटवाळाकडे जाताना केंद्रीय राज्यमंत्र्यांनी  येथील नागरिक खड्डयांतून कसा प्रवास करतात याचा अनुभव घेतला. त्यांच्या यात्रेपूर्वी येथील नागरिकांना वाटले होते की, मंत्री जाणार तर या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल, मात्र तसे घडले नाही. मुख्यमंत्र्यांसाठी रस्त्यांची भरपावसाळ्यात दुरुस्ती केली जात असेल तर केंद्रीय राज्यमंत्र्यांसाठी का होऊ शकत नाही, हाही नागरिकांना पडलेला एक प्रश्न  आहे. पाहूया, आता गणपती बाप्पा येणार आहेत तेव्हा तरी हे खड्डयांचे शुक्लकाष्ट सुटणार का? अन्यथा आता मुख्यमंत्र्यांनाच पाचारण करण्याशिवाय नागरिकांकडे पर्याय उरणार नाही!

---

लेखक : प्रविण आंब्रे, पत्रकार

संपर्क- ९२७०३४९१११