सत्तेच्या आधारे चालणारा आतंकवाद रोखण्यासाठी गांधी-भगतसिंग समजणे आवश्यक 

सत्तेच्या आधारे चालणारा आतंकवाद रोखण्यासाठी गांधी-भगतसिंग समजणे आवश्यक 

कल्याण (प्रतिनिधी) :
सध्याच्या काळात सत्तेतील आतंकवाद रोखायचा असेल तर खरे गांधी, भगतसिंग समाजाला समजणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक चमनालाल यांनी मंगळवारी कल्याणमध्ये बोलताना केले. महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. आंबेडकर, नेहरू यांच्यासारखी व्यक्तिमत्व अभ्यासणे हाच इतिहासाचे विद्रुपीकरण रोखण्याचा एकमेव उपाय असल्याचे ते म्हणाले.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त आणि कॉम्रेड भगतसिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक चमनालाल यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

सध्याचा काळ हा ब्रिटिश सत्तेपेक्षाही कठीण असून मॉब लिंचिंग, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांचे खून सररास घडत आहेत. आज समाजात वैचारिक गोंधळाचे वातावरण असून सत्तेवर बसलेलेच ते पसरवण्यात आघाडीवर आहेत. गांधीजी, भगतसिंग यांच्यासारख्या ऐतिहासिक व्यक्तीतमत्वांना हाताशी धरून इतिहासाचे विद्रुपीकरण सुरू आहे. हे प्रकार दुर्दैवी असून ते रोखण्यासाठी अशा व्यक्तिमत्वांना समजून घेणे आणि त्यांच्या विचारांनाच उत्सवाचे स्वरूप येणे आवश्यक असल्याचे प्रा. चमनालाल म्हणाले. महाराष्ट्र अंनिस, आयटक, राष्ट्रसेवा दल, भाकप, लालबावटा रिक्षा युनियन, AIRSO, शिक्षण स्वाभिमानी संघटना, शिक्षण युवा जनाधिकार संघटना, लोकांचे दोस्त, आदी समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणच्या कॉम्रेड दत्ता देशमुख सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे सुरेखा भापकर, गणेश शेलार, आयटकचे जी. आर. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल चौगुले यांनी केले. 

.