कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : 
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता खालील मार्गांनी प्रवास करावा. मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-पळस्पे फाटा (एन.एच. ४८) येथून जाणाऱ्या वाहनांनी कळंबोली-पनवेल बायपास-डी पॉईंट-करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा या मार्गाचा वापर करावा. तसेच  कळंबोली-वाकण (६७.५ कि.मी.) मार्गावरून जाणाऱ्यांनी  मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-खोपोली-पाली-वाकण या मार्गाचा वापर करावा. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या भागात गणेशोत्सवादरम्यान सोडण्यात येणाऱ्या जादा बसेस, वाहने व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-चिपळूण मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-(एनएच-४) सातारा-उंब्रज-पाटण-कोयना नगर-कुंभार्ली घाट-खेर्डी-चिपळूण या मार्गाचा वापर करावा. कळंबोली-हातखंबा मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-(एनएच ४), सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहुवाडी-आंबा घाट-साखरपा-हातखंबा या रस्त्याने जावे. तसेच कळंबोली-राजापूर मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहुवाडी-आंबा घाट-लांजा-राजापूर या मार्गाने जावे. 

कळंबोली-कणकवली या रस्त्याऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गे  सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरुन-कळे-गगनबावडा घाट-वैभववाडी-कणकवली या रस्त्याचा वापर करावा. सावंतवाडीला जणाऱ्या वाहनांनी कळंबोली-सावंतवाडी ऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेमार्गे सातारा-कराड-कोल्हापूर-निपाणी-आजरा-आंबोली घाट-सावंतवाडी या रस्त्याचा वापर करावा. महामार्गावर येणाऱ्या अडचणी व इतर मदतीसाठी महामार्ग पोलिसांची वेबसाईट www.highwaypolice.maharashtra.gov.in तसेच हेल्पलाईन क्रमांक ९८३३४९८३३४ व ९८६७५९८६७५ तसेच संक्षिप्त संदेश सेवेसाठी (SMS) ९५०३२१११०० व ९५०३५१११०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.