कोकणातील गणेशोत्सव

कोकणातील गणेशोत्सव

कोकणी माणूस चाकरमानी बनुन कामाच्या शोधात मुंबईत आला. मात्र त्याने त्याच्या परंपरा, सण, संस्कृती कायम जपली. कोकणी माणूस आपल्या सणांसाठी आपल्या परंपरांसाठी दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कोकणात जातो. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गौरी-गणपती म्हणजेच कोकणातला गणेशोत्सव होय! कोकणातील गणेशोत्सव सर्व  कुटुंबाला बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरणं, भजनं, सासर-माहेरची माणसं एकत्र येणे असा हा उत्साहवर्धक सण आहे.

कोकणात भाद्रपदातील गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा होतो. हा उत्सव मुख्यत: भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध दशमीपर्यंत चालतो. परंतु आपापल्या इच्छेनुसार, पद्धतीनुसार कुणी एक दिवस, दीड दिवस, तीन, पाच, सात, दहा दिवस गणेशोत्सव साजरा करतात. कोकणात काही ठिकाणी २१ दिवस गणपती आणण्याचीही प्रथा आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला  गजाननाचे घरोघरी आगमन होते. बालगणपतीपासून खूप मोठय़ा आकाराच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. 

कोकणात सार्वजनिक वा घरगुती गणपतींचे आगमन हा एक जल्लोषच असतो. अनेक गावांतून, गावांतील ४०-५० कुटुंबीयांचे गणपती एकत्रित डोक्यावरून वाहून नेतात. गावांतील लोक, आबालवृद्ध महिला, उत्सवाचे कार्यकत्रे पारंपरिक वेशामध्ये लेझीम खेळत, नाचत-गात ढोल-ताशांच्या गजरांत, गुलाल उधळत, वाजत-गाजत गजाननाचे स्वागत करतात, हा देखावा अगदी नजरेत भरण्यासारखा असतो. यातून कोकणातील संघटित उत्सवाचे स्वरूप लक्षात येते.

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा, नैवेद्य दाखविला जातो, आरती केली जाते. गणपतीला खास उकडीचे मोदक नैवेद्यासाठी असतात. आरतीची मजा ही आगळीवेगळी असते. नातेवाईक-शेजारी-पाजारी सगळे जमून प्रत्येक घरी वेळा ठरवून ताला-सुरांत वेगवेगळ्या चालींमध्ये आरत्या म्हटल्या जातात. दोन-दोन तास टाळ, झांजा, ढोलक-मृदंगाच्या साथीने भक्तीत एकरूप होणारे भक्तगण कोकणातच आढळतात. वर्षभर कधी-कुणाकडे जाणं होत नसले तरीही आरतीला, गणपती पाहायला एकमेकांकडे जाण्याची पद्धत इथे आहे. या भेटीमुळे नाते संबंधांनाही बळकटी येते.

कोकणातील गणेशोत्सवाला धार्मिक, कौटुंबिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असे अनेक पैलू आहेत. गणपतीच्या कालावधीत दुपारनंतर भजन, प्रवचन तर रात्री कीर्तन, नमन, खेळे, दशावतार, अशा अनेकविध कार्यक्रमांचीही रेलचेल असते. सांस्कृतिक उपक्रमांवर भर देत अतिशय सद्भावनेने लोककला संवर्धनाचे व संस्कृती जपण्याचे उदात्त कार्य या उत्सवाद्वारे होते. गावकऱ्यांच्या सोबतीने आणि टाळ-मृदंगाच्या साथीने भजन भक्ती ही कोकणची खासियत आहे. गणेशोत्सवात भजनांना अधिकच रंग चढतो. भारतीय संस्कृती मूल्य जतन करण्याचे मोलाचे काम गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणवासीय करत असतात. 

कोकणांमध्ये गणपतीच्या शेजारी गौरीची स्थापना करतात. गणपतीबरोबर येणाऱ्या गौरी सणालाही एक वेगळं वलय आहे. भाद्रपद शुद्ध पक्षात, जेष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन करतात. आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी घरी आणायच्या, दुसऱ्या दिवशी पूजा करायची व तिसऱ्या दिवशी गणपती विसर्जनासोबत त्यांचे विसर्जन करायचे अशी चाल आहे. गौरी विविध ठिकाणी विविध रूपात पूजतात. मुखवटय़ांच्या रूपात, उभ्या पाटावर ठेवून, फोटोच्या रूपात, तेरडय़ाच्या फुलासहित रोपाच्या रूपांत तर काही ठिकाणी खडय़ांच्या रूपात पूजल्या जातात. मुखवटय़ाच्या गौरी अत्यंत आकर्षक, सुंदर व अलंकृत असतात. या ‘गौरी ओवसा’ करण्याची पद्धत असल्याने या सणाला माहेरवाशिणी माहेरी येतात. एकूणच माहेरवाशिणी घरी आल्यामुळे कुटुंबात आनंदीआनंद नांदत असतो.

कोकणातील गणेशोत्सव हा अर्थकारणांचाही मोठा स्रोत आहे. या कालावधीत शहरांतून मोठय़ा प्रमाणात भक्तवर्ग आपापल्या गावी येतो. त्यामुळे कोकण रेल्वेची सर्व तिकीटे चार-चार महिने आधीच बुक झालेली असतात. भक्तवर्गाला प्रवासासाठी शासनाकडून विशेष तरतूद व सोयीसुविधाही पुरवल्या जातात. 

कोकणात गणपती आरास, सजावट याला विशेष महत्त्व दिलं जातं. आर्थिक परिस्थिती उत्तम नसली तरी गणेशोत्सवासाठी काहीतरी करून उत्तम असं मकर गणेशोत्सवासाठी काहीतरी करून उत्तम असं सजावटीचं  सामान घेणारे श्रद्धावान भक्त कोकणात आढळतात. त्यामुळे सजावटीचे रंगरंगोटीचे साहित्य, रंगबिरंगी फुले, फळे यांनी बाजारपेठ फुलून गेलेली असते. तसेच पेणच्या गणपती मूर्ती फक्त कोकणातच नाही तर महाराष्ट्रात, देशात सर्वत्र पाठविल्या जातात. त्यामुळे कोकणातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. पिढय़ापिढ्या एकाच विशिष्ट गणपती कारखान्यामधून आपल्याला हवी तशी मूर्ती घडवून घेण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे. यातूनच मूर्तिकार व गणेशभक्त कुटुंबीय यांच्यातील ऋणानुबंध दृढ होतात.

गणपती विसर्जन हा डोळ्यांत पाणी आणणारा प्रसंग असतो. गेली आठ ते दहा दिवस दिवस आपल्या सोबत आपल्या घरात राहिलेला हा बाप्पा विसर्जनासाठी पाण्यात  सोडताना जणूकाही आपल्या घरातलाच कोणीतरी माणूस आपल्याला सोडून जातोय अशी भावना निर्माण होते. काहीजणांना तर अक्षरश: अश्रू आवरेनासे होतात. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ हा संदेश गजाननाबरोबर नातेवाईकांनाही देत हा आनंद सोहळा संपतो आणि पुन्हा एकदा कोकणवासीयांना वेध लागतात ते पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे ! 

 

लेखक : दिनेश मोरे (डोंबिवली)
इमेल : dineshmore1983@gmail.com