माथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...!

माथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...!
garbett
माथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...!
माथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...!
माथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...!
माथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...!
माथेरानच्या गार्बेट पॉईंटवरील चढाई...!

रविवार आहे घरात बसून, झोपा काढून, किंवा जवळच्या मित्रांना भेटून आयुष्यातील आतापर्यंतचे सर्व रविवार खर्ची घातले. अशात ह्या रविवारी काय करायचं हा प्रश्न होता तर माझा दुर्गप्रेमी मित्र नचिकेत याने शनिवारी whats app ला status  टाकले की ‘चला गार्बेट पॉईंट’. ते status बघितले आणि मी १ - २ मिनिट विचार केला आणि ठरवलं गार्बेट पॉईंटला जायचं.

मला तसा मराठीत trekking आणि इंग्रजीमध्ये म्हणायचं तर गिर्यारोहणाचा छंद किंवा अनुभव मुळीच नव्हता. पण हा रविवार वेगळा घालवायचा या निश्चियाने निर्णय घेतला. ‘चला गार्बेट पॉईंट’ आणि त्यानुसार जमवाजमाव सुरू केली. अगोदर घरातून परवानगी मागितली- मिळाली नाही, तरीही जाणार हा निश्चय होता. मात्र घरातून परवानगी मिळाली. गिर्यारोहणासाठी shoes लागतात उंच डोंगरावर चप्पल नाही चालत, ती पायवाटेवरून घसरते. पण तेथील स्थानिक (आगरी समाजातील) रहिवासी मात्र चप्पल घालतात. आपल्याला त्याची सवय नसते म्हणून आपण बूट घातलेले बरे. पिण्यासाठी दोन लिटर पाणी घेतलं. बॅग खूप जड झाली, तेव्हा पाण्याचे महत्व कळाले.

अनुभवी मित्रांनी वेळेचं अगदी काटेकोरपणे नियोजन करून whats app केलं होत, पण रविवारचा मुंबई लोकलचा अनुभव होताच. सर्व काटेकोरे नियोजन विस्कटलं. सकाळी ११ वाजता भिवपुरीला पोहचलो. आम्ही दिड तास उशिरा पोहचलो होतो.

इथून खरा प्रवास सुरु झाला ...

त्याअगोदर गार्बेट पॉईंटचा इतिहास जाणून घेऊयात

इंग्रजांनी आपल्यावर, म्हणजे सर्व भारतवासियांवर खूप काही अन्याय केले. तसेच इंग्रजांनी खूप काही चांगली कामे केली, त्यातलं एक माथेरानचा शोध!

इंग्रजांना उष्ण उन्हाळ्यात सहलीसाठी एखादे थंड हवेचे ठिकाण शोधायचं होत. तेव्हा मे १८५० मध्ये ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी Hugh Poyntz Malet यांनी माथेरानचा शोध लावला. माथेरान परिसराचा इंग्रजांनी त्याकाळी विकास वैगरे करून मानवी वसाहत सुरू केली आणि माथेरान हे थंड हवेचे, मौजमजा करण्याचे ठिकाण म्हणून उदयास आले.

माथेरानपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेकडे गार्बेट पॉईंट आहे. हे एक निसर्गरम्य पठार आहे. 

आम्ही आता भिवपुरी रेल्वे स्टेशनवर पोहचलो होतो. प्रचंड गर्दी, सर्वत्र अतिउत्साही पर्यटक तिथे पाहायला मिळाले. भिवपुरी हे नैसर्गिक धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याला ‘पिणाऱ्यां’चे माहेरघर म्हणायला हरकत नाही. तेथून बाहेर आलो. मुख्य रस्त्यावर समोरच एक कमान लागते. येथून सरळ दिस्कळ गाव आहे. गावाच्यामधून डोंगराच्या दिशेनं एक रस्ता जातो. दिस्कळ गावाची वाटचाल शहरीकरणाकडे  सुरू झाली आहे. नवीन इमारती उभ्या राहत आहेत. येथील परिसर चांगला आहे. सिमेंटचं जंगलं म्हणणं योग्य नाही, पण वाटचाल त्याच दिशेकडे होताना दिसतेय. डोंगराच्या सुरवातीला गाव आहे. त्यामुळे गावीच आल्यासारखं वाटलं, पण मागे वळून पाहिलं तर हाकेच्या अंतरावर मोठ्या-मोठ्या बिल्डिंग दृष्टीस पडत होत्या. येथून 

दिस्कळ गाव संपताच डोंगर सुरू होतो. जेमतेम १०० मिटरवर चढून गेल्यावर शहरातला आणि निसर्गातला फरक जाणवतो. या ठिकाणी पहिला सेल्फी स्पॉट आला. या ठिकाणी मानवनिर्मित प्रचंड मोठा तलाव असून तो धोम तलाव म्हणून ओळखला जातो. एकीकडून बांध घालून पाणी अडवलं होत. फोटो काढण्यासाठी ही उत्तम जागा आहे. गावातील लहान मूलं पाण्यात गळ टाकून मासे पकडत होते. आणि आम्ही गळ्यात गळे घालून सेल्फीत गुंग होतो, प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो, जोपर्यंत मोबाईल नावाच्या प्राणी हातात पडत नाही तोपर्यंत. फोटो काढून झाले. दूरवर पाणीच पाणी दिसत होते आम्हाला तलावाच्या दुसऱ्या टोकाला जायचं होतं. कमीत कमी दोन किलोमीटरचा गरका म्हणजे तलावाभोवती फेरा होता तो. तेथून पुढे नवीन डोंगर, आता कुठे सुरवात झाली होती.

आम्ही फोटो काढत तलावाच्या दुसऱ्या बाजूला आलो. तेथे एक छोटा ओढा आहे. येथे मनात द्विधा परिस्थिती निर्माण झाली होती. धबधब्या खाली जावं की पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी? कारण एकीकडे सुंदर उंचावरून खाली कोसळणार धबधबा तर दुसरीकडे उंच डोंगराची रांग. मन आवरून धबधब्याचे दुरून दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

त्यांनतर खरी डोंगर चढाई सुरू झाली. तब्बल दोन तास आम्ही गार्बेट पॉईंटच्या दिशेने डोंगरावर चढत होतो. अशात पाऊस सुरू झाला. त्यातच जोरदार हवा सुटली. मोबाईल प्लास्टिकमध्ये ठेवून एका हातात छत्री घेऊन पुढे प्रवास चालू होता. अर्ध्या डोंगरावर एक छोट गाव आहे, सागाची वाडी. तेथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. चौथीपर्यंत असेल. सागाची वाडी संपताच एक विहीर आहे. येथे आम्ही थोडी विश्रांती घेऊन सेल्फी काढले. हा पाडा संपल्यावर थेट उंच चढाई आहे. चढ कठिण नाही, पण अंतर जास्त आहे. त्यामुळे थकवा जाणवतो. येथे चढाई थोडी कठिण आहे. एकच पाउल वाट आहे. दुसऱ्या बाजूला खोल दरी. मध्ये छोटा पाण्याचा झरा लागला. आम्ही येथे झऱ्याचे पाणी पिल. ही कठीणशी चढाई पूर्ण करून सरतेशेवटी आम्ही गार्बेट पठारला पोहचलो. उंच डोंगरावर लांबलचक पठार, चोहोबाजूंनी दरी, समोर डोंगरावर माथेरान आणि पठाराला जोडून बाजूला गार्बेट पॉईंट. भरपूर थकवा आलेला, परंतु निसर्ग सौंदर्य इतकं छान की आराम करण्याची इच्छा होईना. भरपूर जोरदार हवा वाहत होती. जवळपास अर्धा-पाऊण तास विश्रांती घेत फोटो काढत आम्ही गार्बेट पठारावर थांबलो. आम्ही खूप फोटो काढले आणि त्यांनतर पुढे निघालो. अजून उंचावर गार्बेट पॉईंटच्या दिशेने...

गार्बेट पठारांनंतर गार्बेट पॉईंटच्या दिशेची चढाई ही सर्वात कठीण आहे, सरळ उंच. परत घरी जाण्याचा हा मार्ग एकतर सरळ उंच गार्बेट पॉईंटला चढाई करत जा, नाहीतर परत गार्बेट पठारावरून खाली उतरा. आल्या त्या मार्गाने बहुतेक पर्यटक गार्बेट पठारावरून परत जातात. आम्ही गार्बेट पॉईंटच्या दिशेनं चढाई सुरू केली. २ ते ३ वेळा उठत-बसत आम्ही गार्बेट पॉईंटला पोहचलो. आमचं गंतव्य स्थान आलं. खूपच निसर्गरम्य दृश्य चोहोबाजूंनी डोंगर, खाली खोल दरी, दूरवर दिसणारे धरण, धबधबे आणि माथेरान. मध्येच थोडा पाऊस आला, बाजूचे डोंगर दिसेनासे झाले. गार्बेट पॉईंटला लोखंडी तटबंदी केलेली आहे. खूप फोटो काढले. घरून डब्बे आणले होते. तेथेच दुपारचे जेवण केले. आणि नंतर परतीचा मार्ग धरला. आता आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. गार्बेट पॉईंट ते माथेरान प्रवासात घनदाट जंगल लागते. दोन किलोमीटरचा रस्ता असेल. सर्वत्र झाडीझुडपे कसलाच आवाज नाही. अशात जंगलामध्ये काही वळणावर दुरवरील धबधबे दिसतात. घनदाट जंगलामधून चालत माथेरानला गेलो. तेथून टॅक्सी पकडली थेट नेरळ रेल्वे स्टेशनपर्यंत. येथे आमची गार्बेट पॉईंटची भेट संपली.

गार्बेट पॉईंटचे सर्व फोटो बघण्या करिता येथे क्लिक करा 

नोंद : पर्यटन स्थळी कचरा फेकू नये.

--------------------------------------------------------------

लेखक : गणेश आव्हाड, कल्याण.

मोब. : ७२०८२९९७९०